कोल्हापूर : करवीर नगर वाचन मंदिरजवळ रस्ता रोको, १५ दिवसात नो फेरिवाला झोन करण्याचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 07:20 PM2018-02-09T19:20:06+5:302018-02-09T19:29:18+5:30
वाढते अतिक्रमण, अतिक्रमण केलेल्या विक्रेत्यांच्या रोजच्या भांडणाला, अरेरावीला कंटाळून भवानी मंडप परिसरातील करवीर नगर वाचन मंदिरजवळ शुक्रवारी तब्बल तासभर नागरिकांनी रास्ता रोको केला. पुढील १५ दिवसांत हा रस्ता ‘नो फेरिवाला झोन करु’असे आश्वासन महापालिकेचे उपशहर अभियंता एस.के.माने यांनी यावेळी नागरिकांना दिले.
कोल्हापूर : वाढते अतिक्रमण, अतिक्रमण केलेल्या विक्रेत्यांच्या रोजच्या भांडणाला, अरेरावीला कंटाळून भवानी मंडप परिसरातील करवीर नगर वाचन मंदिरजवळ शुक्रवारी तब्बल तासभर नागरिकांनी रास्ता रोको केला. पुढील १५ दिवसांत हा रस्ता ‘नो फेरिवाला झोन करु’असे आश्वासन महापालिकेचे उपशहर अभियंता एस.के.माने यांनी यावेळी नागरिकांना दिले.
करवीर नगर वाचन मंदिर ते बिंदू चौक कारागृह या रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूकीची कोंडी होत आहे. कचऱ्यांचा प्रश्न , किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच अंबाबाई देवी मंदिरात दर्शनासाठी येणारे पर्यटक, भाविक यांचे पाठमोरे छायाचित्र आणि त्यांचे चित्रीकरण अशा गंभीर बाबी होत आहे. यासाठी शुक्रवारी या परिसरातील नागरिकांनी रस्ता रोको केला.
हा प्रकार समजताच उपशहर अभियंता एस.के.माने, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ घटनास्थळी आले. त्यांनी नागरिकांना रस्ता रोको करु नका, अशी विनंती केली. माने यांनी, हा रस्ता १५ दिवसांत नो फेरिवाला झोन करतो, असे आश्वासन दिले. त्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला. पण, १५ दिवसांत नो फेरिवाला झोन झाला नाहीतर पुन्हा रस्त्यावर उतरु, असा इशारा नागरिकांनी यावेळी दिला.
यापुर्वी याप्रश्नी महापालिकेचे आयुक्त यांना निवेदन दिले होते. पण, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे आजचा हा रस्ता रोको करण्यात आला असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले. दरम्यान, २००३ ला भवानी मंडप कमान येथे अतिक्रमणाविरोधात नागरिकांनी आक्रमक भुमिका घेतली होती. त्यानंतर येथील फेरिवाल्यांना महापालिका प्रशासनाने येथून हलवले होते, असे नागरिकांनी सांगितले.
रास्ता रोकोमध्ये शिवराज नाईक, वसंत वाठारकर, अमर झाड, सतीश अतिग्रे, किशोर ओतारी, संजय करजगार, विजय करजगार, तानाजी पाटील, बंडा साळुंखे, अवधूत भाट्ये, दीपक इंगळे, प्रकाश जवळकर, युवराज सावंत, अमित शहा, सुरेश काकडे आदींचा सहभाग होता.