कोल्हापूर रेल्वे फाटकांवरील बांधकाम बंद पाडले, धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीने आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 03:50 PM2017-12-09T15:50:05+5:302017-12-09T16:00:45+5:30
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या कारणावरून रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा रेल्वे फाटक क्रमांक एकवरील वाहतूक बंद करण्याचा शनिवारी सकाळी प्रयत्न केला. मात्र धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीने व प्रवाशांनी याला विरोध करत हे काम बंद पाडले. यावेळी आंदोलक प्रशासन यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली.
कोल्हापूर : प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या कारणावरून रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा रेल्वे फाटक क्रमांक एकवरील वाहतूक बंद करण्याचा शनिवारी सकाळी प्रयत्न केला. मात्र धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीने व प्रवाशांनी याला विरोध करत हे काम बंद पाडले. यावेळी आंदोलक प्रशासन यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली.
आंदोलकांनी आमच्यावर गुन्हे नोंद करा, मात्र आम्ही येथील फाटक बंद होवू देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्याने अखेर प्रशासनाने नरमती भूमिका घेत. येथील काम बंद ठेवल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
रेल्वे प्रशासनाने मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारे रेल्वे फाटक क्रमांक एक हे पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी भिंत बांधून बंद करण्यात आले होते. त्याचा प्रवासी, पादचाऱ्यांना मोठा त्रास होत होता. त्यावर तोडगा काढण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.
कोल्हापूरातील राजर्षी शाहू महाराज टर्मिनल्स येथील रेल्वे फाटक क्रमांक एकवरील वाहतूक पादचाऱ्यांसाठी बंद करू नये या मागणीसाठी शनिवारी धनंजय महाडिक युवा शक्ती, प्रवाशांनी आणि रिक्षा चालक यांच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.(छाया : दीपक जाधव)
यावेळी रखडलेल्या पादचारी पुलासाठी निधी उपलब्ध करून पुलाचे काम होईपर्यंत रेल्वे फाटक पूर्ववत सुरू ठेवण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र प्रशासनाकडून रेल्वे फाटक सुरू करण्याबाबत कोणतीच हालचाल सुरू न केल्याने गेल्याच आठवडयात धनंजय महाडिक युवा शक्ती, नागरिक आणि रिक्षाचालकांतर्फे येथील अडथळे दूर करून हा मार्ग नागरिकांसाठी खुला केला होता.
रेल्वे रुळांवरील वाहतूक सुरू होताच प्रवासी, पादचाऱ्यांसाठी समाधान व्यक्त करण्यात येत होेत. मात्र हा मार्ग पुन्हा बंद करण्यासाठी शनिवारी रेल्वे प्रशासनाच्यावतीने हालचाली सुरु केल्या. ही गोष्ट धनंजय महाडिक युवा शक्तीचे शहराध्यक्ष रफीम सनदी यांना समजली.
त्यांच्यासह युवा शक्तीचे पदाधिकारी, प्रवाशी आणि रिक्षा चालकांनी या कामाला विरोध केला. यावेळी रेल्वे प्रशासन व आंदोलक यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. याबाबत तोडगा काढण्यासाठी सर्वांना रेल्वेच्या आरसीएफ कार्यालयात एकत्र आणण्यात आले. यावेळी रेल्वे प्रशसानाने ये- जा करण्यासाठी नागरिकांनी परीख पूलांचा वापर करा असे सांगितेल.
यावेळी आमच्या गुन्हा नोंद करा मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये रस्ता बंद होवू देणार नाही या भूमिका घेत आंदोलकांनी कार्यालयातच ठिय्या मारल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती स्टेशन प्रबंधक विजयकुमार यांनी तत्काळ वरिष्ठांना कळविण्यात आली. त्यानंतर रेल्वे प्रशसनाने नरमती भूमिका घेत. रस्ता बंद करणार नाही, असे सांगताच आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात महमंद सनदी, वल्लभ जामसांडेकर, मोमीन मुजावर, बबलू सोलकर, तन्वरी सनदी, आयुब हुक्केरी, बिटू बोंद्रे, आयाज शेख यांच्यासह प्रवाशी, रिक्षा चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.