कोल्हापुरात ऊस वाहतूक रोखली, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 10:40 AM2017-10-28T10:40:38+5:302017-10-28T11:01:34+5:30
ऊस दराचा तिढा सुटला नसतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. साखर कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक अडवत शेतकरी संघटनांनी कारखानदारांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.
कोल्हापूर - ऊस दराचा तिढा सुटला नसतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. साखर कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक अडवत शेतकरी संघटनांनी कारखानदारांना एकप्रकारे इशाराच दिला आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी जयसिंगपूर येथे होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत पहिल्या उचलीचा बार फुटणार आहे. संघटना 3300 रुपयांची पहिली उचल देण्याची मागणी करणार आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
संताजी घोरपडे कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारी वाहने शेतकऱ्यानी रात्री उशीरा अडवली. ऊस दराची कोंडी फुटल्याशिवाय ऊस तोड घेऊ नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे. मात्र भोगावती परिसरात संताजी घोरपडे कारखान्याच्या तोडी सुरू आहेत. शुक्रवारी रात्री या कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारी वाहने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवत काही वाहनांची तोडफोडही केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून बाचणी येथून संताजी घोरपडे कारखान्याकडे ऊस वाहतूक सुरू आहे. या कारखान्याच्या ऊस तोडी बाचणी परिसरात सुरू असल्याची माहिती संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. ऊस भरून रोज रात्री वाहने घोरपडे कारखान्याला जात असतानाच शुक्रवारी (27 ऑक्टोबर )मध्यरात्री अचानक परिते ता. करवीर येथील शेळेवाडी फाट्यावर ऊस भरून जाणाऱ्या वाहनांच्या चाकातील हवा सोडण्यात आली.
संघटनेचे कार्यकर्ते दबा धरून बसले होते. ऊस दराची कोंडी जो पर्यत फोडत नाही तो पर्यत कारखाने सुरू करू नये, या शेतकरी संघटनेच्या या इशाऱ्याला न घाबरता घोरपडे कारखाना प्रशासनाने उस वाहतूक सुरूच ठेवली होती. चालू गळीत हंगामातील ऊस दराच्या आंदोलनाची पहिली ठिणगी परिते येथून पडली आहे. रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले. परिते येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा ऊस वाहतुकीचा ट्रॅक्टर अडवून त्याची हवा सोडून वाहतूक बंद करण्यात आली. तसेच हेडलाईट स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले.
या घटनेनंतर या मार्गावरुन सुरू असणारी ऊस वाहतूक ठप्प झाली. रात्री उशीरापर्यंत स्वाभिमानीचे कार्यकर्ते येथे थांबून होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भोगावती परिसर अध्यक्ष जनार्दन पाटील यांनी ऊस दराची कोंडी फुटल्याशिवाय कोणीही ऊस तोडी स्वीकारू नयेत, असे आवाहन करत सर्वच कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारी वाहने अडवणार असून ऊस उत्पादकांनी नुकसान टाळण्यासाठी ऊसतोड घेऊ नये, असे आवाहन केले.
या आंदोलनात युवक अध्यक्ष जर्नादन पाटील, रावसाहेब डोंगळे, रंगराव पाटील, मानाजी पाटील, मनोज पाटील, रंगराव पाटील, सात्ताप्पा पाटील, बाबासो पाटील, रोहित पाटील, सुभाष पाटील, मानाजी पाटील , तानाजी बस्तवाडे या कार्यकर्त्यांनी भाग घेतला.