कोल्हापूर : गोष्ट एका लग्नाची, तेजस्विनी महिला वसतीगृहातील ‘कार्तिकी’ चा विवाह थाटामाटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 04:42 PM2018-05-11T16:42:01+5:302018-05-11T16:42:01+5:30
सनई वाजंत्रीचे मंगल सूर, वऱ्हाडी मंडळीची लगबग, सजलेले वधू-वर आणि पाहुण्यांचा ओसांडून वाहणारा उत्साह अशा मंगलमयी वातावरणात शासकीय तेजस्विनी महिला वसतीगृहातील कार्तिकी हिचा विवाह भुये येथील तानाजी शियेकर यांचाशी शुक्रवारी मोठ्या थाटामाटात झाला. ताराबाई पार्क येथील चंदवाणी हॉल येथे झालेल्या या सोहळ्यात कार्तिकीचे कन्यादान जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहीते यांनी केले.
कोल्हापूर : सनई वाजंत्रीचे मंगल सूर, वऱ्हाडी मंडळीची लगबग, सजलेले वधू-वर आणि पाहुण्यांचा ओसांडून वाहणारा उत्साह अशा मंगलमयी वातावरणात शासकीय तेजस्विनी महिला वसतीगृहातील कार्तिकी हिचा विवाह भुये येथील तानाजी शियेकर यांचाशी शुक्रवारी मोठ्या थाटामाटात झाला. ताराबाई पार्क येथील चंदवाणी हॉल येथे झालेल्या या सोहळ्यात कार्तिकीचे कन्यादान जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहीते यांनी केले.
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हणतात; त्याची प्रचिती येत कार्तिकी राजू गुरव हीची गाठ शिये येथील व्यवसायाने डायलेसीस टेक्निशियन असलेल्या तानाजी शियेकर यांच्याशी बांधली गेली. दुपारी बारा वाजून सात मिनिटांचा मुहूर्तावर व हितचिंतकांच्या शुभाशिर्वादात हा विवाह सोहळा पार पडला.
कार्तिकीचे पालकत्व स्विकारलेले जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहीते यांनी कन्यादान केले. या सोहळ्यास महापौर स्वाती यवलुजे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा महिला बालविकास अधिकारी नितीन मस्के, विधी व सेवा सल्लागार अशिष पुंडफळ, जिल्हा परिविक्षा अधिकारी ई.एम.बारदेस्कर, अधिक्षक बी.जी.काटकर, अधि परिचारीका सुप्रिया दारुवाला आदी उपस्थित होते.
स्वागत वसतीगृहाच्या अधिक्षिका सुजाता शिंदे यांनी केले. आपल्या संस्थेतील सहकारी भगिनीचे लग्न असल्याने अनेक जणी नटून थटून तयार झाल्या होत्या. चंदवाणी हॉल येथील लग्न मंडप सुरेख सजवलेला होता. वरपक्षातील मंडळीचीही लगबग सुरु होती. कन्यादान झाल्यानंतर उपस्थितांनी वधू-वरांना शुभार्शिवाद दिले.
कार्तिकी ही इयत्ता चौथीत असताना तिच्या आजीने जत येथील भगिनी निवेदीता वसतीगृहात दाखल केले. तेथेच तिचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. पुढे अठरा वर्षाची झाल्यानंतर ती कोल्हापूरातील शासकीय तेजस्विनी महिला वसतीगृहात दाखल झाली. पुढील शिक्षण घेत असताना तिने अधिक्षिका शिंदे यांच्याकडे लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानूसार विभागीय उपायुक्तांकडे तिच्या लग्नाबद्दलचा प्रस्ताव पाठविण्यात आला.
दरम्यान तिला संस्थेकडे आलेले इच्छुक वरांची फाईल तिला दाखविण्यात आली. त्यात शिये येथील जनरल नर्सीग व डायलेसीस टेक्निशियन असलेला तानाजी शियेकर पसंत पडला. तानाजी हा सावंतवाडी येथे स्वतंत्र डायलेसीस सेंटर चालवितो. घराची चौकशी केल्यानंतर त्यास मंजूरी मिळाली आणि शुक्रवारी ती विवाहाच्या रेशीमगाठीत बांधली गेली.
जातीपातीच्या पलिकडेही जग आहे, याची जाणीव झाली. त्यात दुग्धशर्करा योग म्हणून मला कार्तिकी सारखी मनासारखी जोडीदार मिळाली.
- तानाजी शियेकर, वर
अनाथ, निराधारांनाही समाजात मानाचे स्थान मिळावे व त्यांनाही सासु सासऱ्यांच्या रुपाने आई वडील मिळावेत. याकरीता अशा लग्नांकरीता समाजाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
- सुजाता शिंदे,
अधिक्षिका, शासकीय तेजस्विनी महिला वसतीगृह, कोल्हापूर