कोल्हापूर : शंभूराजेंच्या बदनामीच्या निषेधार्थ ‘मराठा मावळा’ रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 04:24 PM2018-10-12T16:24:20+5:302018-10-12T16:44:50+5:30
राज्य सरकारतर्फे सर्वशिक्षा अभियानांतर्गत डॉ. शुभा साठे लिखित ‘समर्थ रामदास स्वामी’ पुस्तकातून छत्रपती शंभूराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापून बदनामी करण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ सकल मराठा मावळातर्फे शुक्रवारी मिरजकर तिकटी येथे या पुस्तकाच्या कव्हर फाडून तीव्र निषेध करण्यात आला.
कोल्हापूर : राज्य सरकारतर्फे सर्वशिक्षा अभियानांतर्गत डॉ. शुभा साठे लिखित ‘समर्थ रामदास स्वामी’ पुस्तकातून छत्रपती शंभूराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापून बदनामी करण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ सकल मराठा मावळातर्फे शुक्रवारी मिरजकर तिकटी येथे या पुस्तकाच्या कव्हर फाडून तीव्र निषेध करण्यात आला.
यावेळी मावळ्यांनी लेखिकेसह मुख्यमंत्री व सरकारच्या विरोधात शेलक्या शब्दात घोषणा देत निदर्शने केली.
बदनामीप्रकरणी संबंधितांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) यांच्याकडे करण्यात आली.
राज्य सरकारच्या शिक्षण विभागातर्फे सर्व शिक्षा अभियानांतर्गत डॉ. शुभा साठे यांनी लिहिलेल्या समर्थ रामदास स्वामी या पुस्तकात छत्रपती शंभूराजे यांच्याबद्दल बदनामीकारक व आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आला आहे. याचे तीव्र पडसाद कोल्हापूरात उमटले.
सकल मराठा मावळा संंघटनेतर्फे मिरजकर तिकटी येथे दुपारी साडे बाराच्या सुमारास याचा निषेध करण्यात आला. यावेळी लेखिकेसह सरकार व मुख्यमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा देत मावळ्यांनी परिसर दणाणून सोडला. या पुस्तकाची कव्हर फाडून ती फेकत तीव्र निदर्शने करण्यात आली.
यानंतर शिष्टमंडळाने जाऊन जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक )यांना निवेदन सादर करण्यात आले. कोणताही पुरावा नसताना पुर्वगृहदुषितपणाने छत्रपती शंभूराजे यांची पाठ्यपुस्तकातून वेळीवेळी बदनामी केली जात आहे. डॉ. साठे लिखित पुस्तकातूनही बदनामीकारक मजकूर छापण्यात आला आहे.
याबद्दल सरकार, शिक्षण विभागाने कशी परवानगी दिली. या पुस्तकाला वाटपाची मान्यता कोणी दिली? याची चौकशी करुन मान्यता देणारे संबंधित अधिकारी, सर्व शिक्षण अभियान प्रमुख, पुस्तकाचे प्रकाशक, लेखक यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.
याबाबत सरकारने लवकरात लवकर खुलासा नाही केला तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, याची सर्वस्वी जबाबदारी सरकारवर राहील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. आंदोलनात उमेश पोवार, दिलीप सावंत, संदीप बोरगावे, अमोल गायकवाड, रमाकांत बिरंजे, दत्तात्रय संकपाळ आदींसह मावळे सहभागी झाले होते.