कोल्हापूर : ‘एमबीए’च्या प्रवेशपूर्व परीक्षेला विद्यार्थी मुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 02:41 PM2018-05-28T14:41:11+5:302018-05-28T14:41:11+5:30
प्रवेशपत्राची रंगीत छायांकित प्रत आणि परीक्षेसाठी अर्ज केल्याची प्रत नसल्याने ‘एमबीए’ अभ्यासक्रमाच्या आॅनलाईन प्रवेशपूर्व परीक्षेला तीस विद्यार्थी मुकले. कोल्हापुरातील ताराबाई पार्क परिसरातील परीक्षा केंद्रांवर हा प्रकार घडला.
कोल्हापूर : प्रवेशपत्राची रंगीत छायांकित प्रत आणि परीक्षेसाठी अर्ज केल्याची प्रत नसल्याने ‘एमबीए’ अभ्यासक्रमाच्या आॅनलाईन प्रवेशपूर्व परीक्षेला तीस विद्यार्थी मुकले. कोल्हापुरातील ताराबाई पार्क परिसरातील परीक्षा केंद्रांवर हा प्रकार घडला.
असोसिएशन आॅफ इंडियन मॅनेजमेंट स्कूलच्यावतीने पदवीनंतर दोन वर्षाच्या एमबीए अभ्यासक्रमाच्या आॅनलाईन प्रवेश परीक्षेसाठी केआयटी कॉलेज, सायबर इन्स्टिट्यूट, हनुमान नगर आणि ताराबाई पार्क परिसरातील केंद्रांवर पूर्व परीक्षा आयोजित केली होती.
परीक्षेची वेळ दुपारी दोन ते सायंकाळी पाच अशी होती. त्यासाठी दुपारी एक वाजता परीक्षार्थींना केंद्रांवर येण्याची सूचना दिली होती. त्यानुसार परीक्षार्थी ताराबाई पार्क परिसरातील केंद्रावर आले. त्यांच्याकडून प्रवेशपत्राची रंगीत छायांकीत प्रत अथवा परीक्षेसाठी अर्ज केल्याची प्रतीची या केंद्रावर पर्यवेक्षकांनी मागणी केली.
या प्रती नसल्याने सुमारे तीस विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी केंद्रावर प्रवेश देण्यात आला नाही. यावर काही पालकांनी छायांकीत प्रत देईपर्यंत परीक्षार्थींचे लॉगइन करण्याची मागणी केली, तरीही परीक्षार्थींना प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे या केंद्रावर परीक्षार्थींचा गोंधळ निर्माण झाला.
वर्ष वाया जाणार असल्याच्या भीतीने काही परीक्षार्थींना रडू आले. दरम्यान, रंगीत छायांकीत प्रत आणण्याबाबत प्रवेशपत्रावर सूचना नव्हती, असे परीक्षार्थींनी सांगितले. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी फेरपरीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थी, पालकांनी केली.