कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी लिहिते व्हावे : विनोंद कांबळे, चिल्लर पार्टीतर्फे मुलांसाठी दोन पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 02:49 PM2018-05-31T14:49:51+5:302018-05-31T14:49:51+5:30
विद्यार्थ्यांचे भावविश्व वेगळे असते. ते विद्यार्थ्यांनी शब्दबध्द केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी लिहिते व्हावे, असे आवाहन दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे सचिव प्रा. विनोद कांबळे यांनी शाहू स्मारक भवन येथे केले.
कोल्हापूर : विद्यार्थ्यांचे भावविश्व वेगळे असते. ते विद्यार्थ्यांनी शब्दबध्द केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी लिहिते व्हावे, असे आवाहन दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे सचिव प्रा. विनोद कांबळे यांनी शाहू स्मारक भवन येथे केले.
पुस्तके विकत घेउन वाचण्याची सवय विद्यार्थ्यांना लागावी, यासाठी चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीमार्फत मोफत चित्रपट प्रदर्शनासोबतच पुस्तकांचीही चळवळ सुरु केली आहे. या उपक्रमांतर्गत चंद्रकांत निकाडे यांनी लिहिलेल्या गृहपाठी आणि कुडतं या दोन कथासंग्रहाच्या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रा. कांबळे यांनी चिल्लर पार्टीच्या विविध उपक्रमांचे कौतुक आपल्या भाषणात केले. चिल्लर पार्टीच्या सदस्यांनी लिहिलेल्या अनुभवाचे पुस्तक दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेमार्फत प्रकाशित करण्याचे अभिवचन यावेळी त्यांनी दिले.
कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकाचे लेखक चंद्रकांत निकाडे यांनी आपल्या भाषणात लहान मुले ही माझ्या लेखनाची प्रेरणा आहे, असे सांगून प्रकाशित झालेली पुस्तके पाच लाख विद्यार्थ्यांपर्यत पोहचविण्याचा संकल्प केला असल्याचे जाहीर केले.
चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीच्या प्रा. समीक्षा फराकटे यांनी सूत्रसंचालन केले. जयसिंग चव्हाण यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला तर अनिल काजवे यांनी आभार मानले. यावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी चंद्रकांत निकाडे यांनी लिहिलेली पुस्तके विकत घेतली.
बिया संकलन उपक्रमाला प्रतिसाद
पावसाळ्यात वेगवेगळ्या बिया जिल्ह्यात रुजविण्यासाठी बिया संकलन करण्याचा उपक्रम चिल्लर पार्टीतर्फे राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला. साठवलेल्या बिया जुनअखेर चिल्लर पार्टीकडे जमा कराव्यात, असे आवाहन उदय संकपाळ यांनी केले आहे.