कोल्हापूर :विद्यार्थ्यांनी सिनेमातून जगण्याची दिशा ठरवावी : सागर तळाशीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 04:03 PM2018-02-21T16:03:08+5:302018-02-21T16:14:41+5:30
सिनेमाचे माध्यम प्रभावी आहे, त्यातून नुसत्याच गमतीजमतीबरोबरच जगण्याची दिशा ठरवा असा संदेश देत अभिनेते सागर तळाशीकर यांनी चिल्लर पार्टीच्या तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवात विद्यार्थ्यांना सिनेमा कसा पहावा याबाबत मार्गदर्शन केले.
कोल्हापूर : सिनेमाचे माध्यम प्रभावी आहे, त्यातून नुसत्याच गमतीजमतीबरोबरच जगण्याची दिशा ठरवा असा संदेश देत अभिनेते सागर तळाशीकर यांनी चिल्लर पार्टीच्या तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवात विद्यार्थ्यांना सिनेमा कसा पहावा याबाबत मार्गदर्शन केले.
येथील शाहू स्मारक भवन येथे बुधवारी चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळ आयोजित तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवाचा प्रारंभ झाला. या महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून सागर तळाशीकर बोलत होेते. तत्पूर्वी महोत्सवाची थीम असणाऱ्या पतंग उडविणाऱ्या मुलीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या विद्यार्थिनीच्या हस्ते पतंगाच्या प्रतिकृतीचे अनावरण करुन अभिनव पध्दतीने या तिसऱ्या बालमहोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सागर तळाशीकर म्हणाले, चिल्लर पार्टीने आयोजित केलेल्या बालमहोत्सवात जगभरातील चित्रपट पहायला मिळतात. वेगवेगळ्या देशातील लोक चित्रपट बनवत असतात, तेही कधीतरी लहान होतेच. त्यांच्या अनुभवातून आलेले चित्रपट पाहण्यामागे आपण कसे जगतो, हे मांडलेले असते. म्हणून हे चित्रपट कसे पहायचे हे जाणून घ्या. सत्कार्याला कसे वापरावे हे आपल्या हाती आहे. सिनेमातून आपणाला जगायचे कसे हे शिकायला मिळते, त्याकडे लक्ष केंद्रीत करा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रत्येक मुलाच्या आयुष्याचाही एक सिनेमा असतो. त्याचे हिरो तुम्ही असता, तुमच्या आयुष्याचे गणित कसे सोडवायचे, हव्या असलेल्या ठिकाणी कसे पोहोचायचे, याचा विचार करणारी दिशा सिनेमातून मिळवायची असते. यासाठी चिल्लर पार्टीच्या या उपक्रमाचे योगदान मोठे आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या प्राथमिक शिक्षण मंडळ समितीच्या सभापती वनिता अशोक देठे यांनीही चिल्लर पार्टीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमाला महानगरपालिका नेहमीच मदतीचा हात पुढे करत राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
प्रास्तविक चिल्लर पार्टीचे ओंकार कांबळे याने केले. स्वागत आणि परिचय अर्शद महालकरी याने करुन दिला तर आभार युवराज देशमुख याने मानले. सागर तळाशीकर यांचा शिवप्रभा लाड यांनी तर वनिता देठे यांचे अभय बकरे यांच्या हस्ते पुस्तक ेभेट देउन स्वागत करण्यात आले.
यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळ समितीच्या सभापती वनिता अशोक देठे, प्रशासन अधिकारी विश्वास सुतार, अभिनेते सागर तळाशीकर, चिल्लर पार्टीचे समन्वयक मिलिंद यादव, अभय बकरे, सचिन पाटील, रविंद्र शिंदे, नसीम यादव, समीक्षा फराकटे, गुलाबराव देशमुख, चंद्रशेखर तुदीगाल, विठ्ठल लगळी, सिध्दी नलावडे, श्रीराम जाधव, अभिजीत कांबळे, ए.के.शिंदे, अनिल काजवे आदी उपस्थित होते.
चिल्लर पार्टी आयोजित तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दिल्ली सफारी, रॅटिट्यूएल आणि अॅडव्हेंचर्स आॅफ टिनटिन हे बालचित्रपट दाखविण्यात आले. कोल्हापूर शहरातील महानगरपालिकेच्या ३३ शाळांमधील १५00 विद्यार्थ्यांनी हे चित्रपट पाहिले.
चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीमार्फत गेली सहा वर्षे मुलांसाठी मोफत चित्रपट दाखविण्यात येतात. गेली तीन वर्षे गरीब आणि महानगरपालिकेतील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बाल चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येतो. यंदाचा तिसरा बालचित्रपट महोत्सव येथील शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवात कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या सहकार्याने कोल्हापूरातील ६0 शाळा सहभागी झाल्या आहेत. या शाळांमधील निवडक ५00 विद्यार्थ्यांनी पतंगावर रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन या महोत्सवात भरविण्यात आले आहे.