कोल्हापूर : उत्तरपत्रिका गहाळ झालेल्या विद्यार्थ्यांना गुण मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 07:19 PM2018-05-17T19:19:41+5:302018-05-17T19:19:41+5:30
महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलमधील (एमएलजी) उत्तरपत्रिका गहाळ प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या आहेत, त्यांना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे नियम आणि सूचनांनुसार गुण मिळणार आहेत.
कोल्हापूर : महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलमधील (एमएलजी) उत्तरपत्रिका गहाळ प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या आहेत, त्यांना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे नियम आणि सूचनांनुसार गुण मिळणार आहेत.
दहावीच्या ‘माहिती-तंत्रज्ञान व संवाद’ या विषयाच्या नऊ उत्तरपत्रिका एमएलजी हायस्कूलमधून एप्रिलमध्ये गहाळ झाल्या. या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका भूपाली शिंदे यांनी उत्तरपत्रिका गहाळ झाल्याप्रकरणी पोलिसांत फिर्याद नोंदविली.
याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. या उत्तरपत्रिका गहाळ प्रकरणाची माहिती शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाने राज्य शिक्षण मंडळाला दिली. मुख्याध्यापिका शिंदे यांनी याबाबतचा अहवाल कोल्हापूर विभागीय मंडळाला दिला.
या प्रकरणाबाबत मंडळाकडून चौकशी केली जात आहे. आठ-दहा दिवसांमध्ये चौकशीची प्रक्रिया पूर्ण करून त्याचा अहवाल राज्य मंडळाला सादर केला जाईल. या गहाळ उत्तरपत्रिका सापडल्या नाहीत, तर शिक्षण मंडळाच्या नियमानुसार सरासरी गुण देण्यात येतील. कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही, असे शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय सचिव पुष्पलता पवार यांनी सांगितले.
कारवाई करा; अन्यथा आंदोलन
उत्तरपत्रिका गहाळप्रकरणी एमएलजी हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षक यांच्यावर कारवाई करावी; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा युवक विद्यार्थी-पालक प्रवेश हक्क व संरक्षण संघटनेने दिला आहे. याबाबतचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी (दि. १६) शिक्षण मंडळाचे सहसचिव टी. एल. मोळे यांना दिले. या निवेदनाद्वारे सुशांत बोरगे, फिरोज सरगूर, मधुकर हरेल, बाबूराव कदम, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.