वीकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूर स्तब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:21 AM2021-04-12T04:21:15+5:302021-04-12T04:21:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या वीकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीही कोल्हापूर स्तब्ध दिसत होते. शहरातील नागरिकांमधून ...

Kolhapur stunned on the second day of the weekend lockdown | वीकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूर स्तब्ध

वीकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूर स्तब्ध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या वीकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीही कोल्हापूर स्तब्ध दिसत होते. शहरातील नागरिकांमधून लॉकडाऊनला स्वत:हून प्रतिसाद मिळत असल्याने मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठांत शुकशुकाट होता. ग्रामीण भागातही दुकाने, भाजी मंडई, आठवडा बाजार बंद होते.

कोरोनाचा विळखा वाढत असल्याने राज्य सरकारने शनिवारपासून वीकेंड लॉकडाऊन जाहीर केले होते. त्यानुसार गेले दोन दिवस कोल्हापूर शहर व जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पाळले जात आहे. रविवारी कोल्हापुरात लक्ष्मीपुरी येथे मोठा आठवडा बाजार भरतो. मात्र यावेळेला बाजाराच्या ठिकाणी नीरव शांतता होती. रंकाळा, दुधाळी, उत्तरेश्वर पेठ, शिवाजी पेठ येथील दुकाने बंद होती. नागरिक दारात कट्ट्‌यावर वृत्तपत्रे वाचत गप्पा मारताना दिसत होते. अंबाबाई मंदिर, महाद्वार राेड, शिवाजी चौक, बिंदू चौक, राजारामपुरी, शाहूपुरी, स्टेशन रोड, मध्यवर्ती बसस्थानक, ताराराणी चौक हा परिसर गजबजलेला असतो, मात्र रविवारी शांतता होती. अत्यावश्यक सेवा व महत्त्वाच्या कामासाठी तुरळक नागरिक घराबाहेर पडलेले दिसले. शनिवारच्या तुलनेत रविवारी नागरिकांनी घरीच राहणे अधिक पसंत केल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्यामुळे पोलीस यंत्रणाही काहीशी निवांत दिसत होती. रविवार असल्याने बहुतांशी रुग्णालये बंद होती, त्यामुळे रुग्णालयांतही फारशी गर्दी दिसत नव्हती. त्याचा परिणाम औषध दुकानांवर दिसत होता. औषधांची अनेक दुकाने अक्षरश: ओस पडली होती.

ग्रामीण भागातही दुसऱ्या दिवशी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करण्यात आले. ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने भीतीचे वातावरण होते. नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन केले. दुकाने, भाजी मंडई, आठवडा बाजार बंद ठेवत सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी आज झुंबड

दोन दिवस लॉकडाऊन असल्याने नागरिकांना गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी वेळ मिळालेला नाही. त्यामुळे आज, सोमवारी दिवसभर खरेदीसाठी झुंबड उडणार हे निश्चित आहे.

लॉकडाऊन वाढला तर काय..?

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार किमान २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहे. दोन दिवस व्यवहार बंद ठेवून नागरिकांनी सरकारला सहकार्य केले. मात्र आणखी २१ दिवस बंद ठेवावे लागले, तर जगायचे कसे? अशी भीती सामान्य नागरिक, छोट्या व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

पोलिसांना स्वयंसेवी संस्थांकडून ताक वाटप

कोल्हापूर शहरातील प्रमुख रस्ते, चौक, नाक्यावर सकाळपासून पोलीस तैनात होते. उन्हाच्या तडाख्यात दुकाने, टपरी, झाडाच्या सावलीत उभ्या असलेल्या काही पोलिसांना स्वयंसेवी संस्थांनी ताक वाटप केले.

गल्लोगल्ली क्रिकेट

लॉकडाऊन, त्यात रविवार असल्याने उत्तरेश्वर पेठ, दुधाळी, शिवाजी पेठ आदी परिसरात तरुणांनी गल्लीतच क्रिकेटचे मैदान केले होते. दुपारी बारापर्यंत आणि दुपारी तीननंतर हा खेळ रंगला होता.

सायंकाळी आयपीएल मॅच बघण्यात दंग

सध्या आयपीएल क्रिकेट सुरू आहे. दिवस विविध खेळांत घालवला तरी, सायंकाळी सातपासून आयपीएलचा सामना टीव्ही, मोबाईलवर पाहण्यात तरुणाई दंग होती.

Web Title: Kolhapur stunned on the second day of the weekend lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.