कोल्हापूर : खुल्या जागांचा विषय अखेर विधिमंडळात, ‘लोकमत’चा प्रभाव : अमल महाडिक यांचा तारांकित प्रश्न
By Madhuri.pethkar | Published: February 23, 2018 11:31 AM2018-02-23T11:31:00+5:302018-02-23T11:38:20+5:30
ग्रामपंचायतींच्या ताब्यात नसलेल्या खुल्या जागांचा प्रश्न केवळ आणि केवळ ‘लोकमत’ने ऐरणीवर आणला असताना आता याची दखल घेत आमदार अमल महाडिक यांनी विधानसभेच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे.
कोल्हापूर : ग्रामपंचायतींच्या ताब्यात नसलेल्या खुल्या जागांचा प्रश्न केवळ आणि केवळ ‘लोकमत’ने ऐरणीवर आणला असताना आता याची दखल घेत आमदार अमल महाडिक यांनी विधानसभेच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे.
‘लोकमत’ने हा विषय मांडल्यानंतर एकीकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन त्यादृष्टीने माहितीचे संकलन सुरू करण्याच्या सूचना दिल्या असताना आता थेट विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित होत असल्याने याबाबत निश्चित असे धोरण आखले जाण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी वसाहतींचा ले-आऊट तयार करताना कुपनलिका, उद्यान, मंदिरे, सांस्कृतिक सभागृहे, ग्रंथालय व अंगणवाडी, बालवाडी, शाळा बांधण्यासाठी आरक्षित जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नावे न केल्याने या जागांचा विकास झाला नाही तसेच या जागांवर अतिक्रमणांचा धोका निर्माण झाला आहे; याबाबतची वस्तुस्थिती काय, अशी विचारणा महाडिक यांनी केली आहे.
याबाबतीत शासनाने कोणती कार्यवाही केली, अशी विचारणा या तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून आमदार महाडिक यांनी केली आहे तसे नसल्यास विलंबाची कारणे काय, असेही विचारले असून याबाबत महाराष्ट्र शासनाच्या कार्यासन अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती मागविली आहे.
शिरोलीत ग्रामपंचायत सदस्याच्या मुलाचे अतिक्रमण
याचे उदाहरण म्हणून आमदार महाडिक यांनी शिरोली (ता. हातकणंगले) येथील उदाहरण दिले आहे. ग्रामपंचायत हद्दीतील गटक्रमांक ५४३ मधील जागेवर एका विद्यमान ग्रामपंचायत सदस्याच्या मुलानेच अतिक्रमण करत त्या ठिकाणी वीटभट्टी, स्क्रॅप व्यवसाय, सिलिका वाळू, भाडोत्री खोल्या असे विविध उद्योग सुरू क रून अतिक्रमण केल्याचे जानेवारी २०१८ मध्ये निदर्शनास आले आहे हे खरे आहे काय, अशी विचारणा तारांकित प्रश्नाद्वारे केली आहे.