कोल्हापूर : यशस्वी यादव जातील तिथे वादग्रस्त, कोल्हापूरच्या प्रकरणातही झाली होती बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 06:49 PM2018-03-16T18:49:06+5:302018-03-16T18:49:06+5:30
जातील तिथे ‘वादग्रस्त’ अशी लेबल लागलेले औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव २००९-१० मध्ये कोल्हापूरमध्ये चांगलेच वादग्रस्त ठरले. महिला पोलीस लैंगिक अत्याचार प्रकरणामधून त्यांची तडकाफडकी बदली झाली. त्यांच्या कारकिर्दीत खादी वर्दीला लागलेला बदनामीचा डाग खात्याला अद्यापही पुसता आलेला नाही.
कोल्हापूर : जातील तिथे ‘वादग्रस्त’ अशी लेबल लागलेले औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव २००९-१० मध्ये कोल्हापूरमध्ये चांगलेच वादग्रस्त ठरले. महिला पोलीस लैंगिक अत्याचार प्रकरणामधून त्यांची तडकाफडकी बदली झाली. त्यांच्या कारकिर्दीत खादी वर्दीला लागलेला बदनामीचा डाग खात्याला अद्यापही पुसता आलेला नाही.
औरंगाबादमधील मिटमिटा येथे कचरा टाकण्यास विरोध करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी मारहाण केल्याने पोलीस आयुक्त यादव यांना शासनाने सक्तीच्या रजेवर पाठविले. या प्रकरणावरून पुन्हा यादव राज्यभर चर्चेत आले. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून यशस्वी यादव यांनी २००९ मध्ये पदभार स्वीकारला होता.
सुरुवातीपासून त्यांनी स्वत:ची ‘दबंग’ पर्सनॅलिटी ठेवली होती. त्यांच्या अवतीभवती नेहमी पोलिसांची फौज असायची. डोळ्यांवर किमती गॉगल अशा रुबाबात त्यांनी दीड वर्ष कार्यभार सांभाळला. त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यांनी त्यांचा मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेतला.
तत्कालीन गृह पोलीस उपअधीक्षक विजय परखाळे, ‘शाहूपुरी’चे तत्कालीन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मुंडे हे दोन अधिकारी महिला लैंगिक प्रकरणात चांगलेच गाजले. मुंडे यांचे हॉटेलमधील चित्रीकरण राज्यभर प्रसारित झाले.
या दोन अधिकाऱ्यांना पाठबळ दिल्यामुळे तर यशस्वी यादव चांगलेच अडचणीत आले. काही प्रमाणात त्यांचाही या प्रकरणात हात असल्याची चर्चा झाली. या तिन्ही अधिकाऱ्यांमुळे खात्यातील महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली होती.
पोलीस अधीक्षक यादव यांचा अवैध व्यावसायिकांवर वचक नव्हता; त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र अवैध व्यवसाय फोफावले होते. गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व वाढले होते. कायदा व सुव्यवस्था पूर्णत: हाताबाहेर गेली होती.
यादव हे नागरिकांत कधी सहभागी झालेच नाहीत; त्यामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद दुरावला होता. त्यांचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच महिला लैंगिक अत्याचारामध्ये ते वादग्रस्त ठरले आणि त्यांची तडकाफडकी बदली झाली.
त्यांच्या कारर्किर्दीतील महिला लैंगिक अत्याचार प्रकरणाची तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पोलीस महासंचालकांनी चौकशी लावली होती. याच कालावधीत त्यांच्या पत्नी जयश्री भोज-यादव ह्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.