कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी शिवाजी चौकात रिक्षाचालकांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:05 PM2018-08-25T12:05:20+5:302018-08-25T12:09:24+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूर शहर-जिल्ह्यातील रिक्षाचालकांनी शिवाजी चौकात रिक्षांसह ठिय्या आंदोलन केले. त्यामध्ये भाजी विक्रेत्या महिला सहभागी झाल्या. त्यांनी सकल मराठा शौर्यपीठातर्फे सुरू असलेल्या लढ्याला पाठिंबा जाहीर केला.
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूर शहर-जिल्ह्यातील रिक्षाचालकांनी शिवाजी चौकात रिक्षांसह ठिय्या आंदोलन केले. त्यामध्ये भाजी विक्रेत्या महिला सहभागी झाल्या. त्यांनी सकल मराठा शौर्यपीठातर्फे सुरू असलेल्या लढ्याला पाठिंबा जाहीर केला. ठिय्या आंदोलनामुळे शिवाजी चौकातील वाहतूक ठप्प झाली.
या चौकात दुपारी साडेबाराच्या सुमारास रिक्षाचालक आणि भाजी विक्रेत्या महिला दाखल झाल्या. त्यातील चालकांनी आपल्या रिक्षा शिवाजी चौक ते माळकर तिकटीपर्यंत रस्त्यावर लावल्या.
कोल्हापुरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवाजी चौकात सकल मराठा शौर्यपीठातर्फे सुरू असलेल्या आंदोलनात भाजी विक्रेत्या महिला सहभागी झाल्या. (छाया : नसीर अत्तार)
भाजी विक्रेत्या महिलांनी शौर्यपीठावर ठिय्या मारला. त्यानंतर ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे’, ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणांनी त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी प्रसाद जाधव, राजू जाधव, दीपा पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले.
या आंदोलनात उदय लाड, राहुल इंगवले, शिवाजीराव लोंढे, बाबासो देसाई, सुभाष पाटील, बंडा रकटे, शामराव भोजणे, अमोल पाटील, श्रीकांत वंदुरे, रंंजना खाडे, वंदना बुचडे, पार्वती शहा, हमिदा चौगुले, वैशाली पाटील, वंदना सताजी, उज्ज्वला पिसाळ, सावित्री पाटील, अक्काताई अवळे, मुमताज करंडे, सखूबाई शिंदे, राजश्री मोरे, वहिदा मुजावर, सलमा बागवान, मनीषा क्षीरसागर, आदींसह कसबा बावडा, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत-नेर्ली, शिवाजी चौक रिक्षा मित्रमंडळ, भवानी मंडप, वडगाव, गांधीनगर, जरगनगर, पाचगाव, कळंबा रिक्षा स्टॉपवरील चालक, शाहूपुरी, गांधीनगर, टिंबर मार्केट भाजी मंडईतील महिला भाजी विक्रेत्या सहभागी झाल्या.
दरम्यान, आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी दि. २ सप्टेंबरला विविध तालीम संस्था, मंडळांची व्यापक बैठक घेण्यात येणार असल्याचे प्रसाद जाधव यांनी सांगितले.
आरक्षणाची गरज
या आंदोलनावेळी काही रिक्षाचालक, भाजी विक्रेत्या महिलांनी मनोगत व्यक्त केले. त्यात रिक्षाचालकांनी वाहनखरेदीसाठी बँकांकडून कर्ज घेताना आलेले अनुभव सांगितले. भाजी विक्रेत्यांनी आम्ही भोगलेली वाताहत आमच्या पुढील पिढीला भोगायला लागू नये, म्हणून मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याची भावना व्यक्त केली.