कोल्हापूर : सुधीर फडके म्हणजे चालतं, बोलतं संगीत : पद्माकर पाठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 11:20 AM2019-01-08T11:20:35+5:302019-01-08T11:22:13+5:30
अतिशय खडतर परिस्थितीत व कोणतेही संकट आले तरी त्याला सामोरे जात सुधीर फडकेंनी गायनात आणि संगीतात चांगले काम केले. सुधीर फडके म्हणजे चालतं, बोलतं संगीत होतं, असे मत पद्माकर पाठक यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.
कोल्हापूर : अतिशय खडतर परिस्थितीत व कोणतेही संकट आले तरी त्याला सामोरे जात सुधीर फडकेंनी गायनात आणि संगीतात चांगले काम केले. सुधीर फडके म्हणजे चालतं, बोलतं संगीत होतं, असे मत पद्माकर पाठक यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.
करवीरनगर वाचन मंदिर आयोजित पद्मभूषण वि. स. तथा भाऊसाहेब खांडेकर व्याख्यानमालेत ‘स्वरतीर्थ सुधीर फडके तथा बाबूजी’ या विषयावर ने बोलत होते. उपाध्यक्ष नंदकुमार मराठे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी पद्माकर पाठक म्हणाले, लहानपणापासूनच त्यांना गायन व संगीतात आवड होती. त्यांचे वडील विनायक वामन फडके यांचे कोल्हापूरकरांबरोबर जिव्हाळ्याचे संबध होते. त्यानंतर मामाच्या ओळखीने ते मुंबईला गेले; पण वयाच्या १४ व्या वर्षी ते पुन्हा कोल्हापुरात आले. कोल्हापुरातील कवी न. ना. देशपांडे यांच्याबरोबर ओळखीतून १९३४ ला त्यांनी गणेशोत्सवात काम केले. त्यांचे मूळ नाव राम फडके होय.
चांगले गाणी म्हणायची असेल तर चांगली गीते ऐकली पाहिजेत. हे ओळखून त्याकाळी ते महाद्वार रोडवरील हॉटेल सेंट्रलच्या बाहेर उभे राहून गीतांचा आस्वाद घेत. त्या गीतांची जागा काय, हरकती काय, यांचा ते अभ्यास करीत. त्याप्रमाणे ते गाणी म्हणण्याचा प्रयत्न करीत. तसेच ते दर गुरुवारी अंबाबाई मंदिरातील रामाच्या पाराजवळ जात. तेथे भक्तांची गीते ऐकायची.
याच दरम्यान ते बालमित्र बाळ गाडगीळ यांच्या संपर्कात आले व त्यांनी कोल्हापुरात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे काम सुरू केले. या काळात त्यांनी मित्र परिवार तयार केला. समाजातील दु:खद प्रसंगी एखाद्याला मदत करायची असे त्यांनी ठरविले. त्यानुसार मित्रांसोबत काम करू लागले. गायनाकडे ते उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पाहत होते.
कोल्हापुरातून ते मुंबई येथे गेले. तेथे पोटासाठी त्यांनी बॅण्ड वाजविण्याचे, घरोघरी जाऊन चहा पावडर विक्री करायचे; पण त्यांना काहीजण याचे पैसे द्यायचे नाहीत. भाजी विक्रीचा व्यवसाय सुरूकेला. मात्र, प्रकृती कारणामुळे त्यांनी हा व्यवसाय सोडून दिला. या अडचणीच्या काळात त्यांना अभिनेत्री दुर्गा खोटे भेटल्या. त्यांची भेट झाली; परंती काहीनी त्यांच्याबद्दल अपप्रचार केला असल्याने तेथेही त्यांना संधी मिळाली नाही आणि ते करिअरसाठी मुंबईहून नाशिकला गेले. कार्यवाह सतीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. संचालक प्रशांत वेल्हाळ यांनी आभार मानले.