कोल्हापूर : ‘सरकारी कर्मचारी मध्यवर्ती’चा कामगार संपाला पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:46 PM2019-01-09T12:46:30+5:302019-01-09T12:48:48+5:30
शासनाच्या कामगार व कर्मचारीविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी देशातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार व कर्मचारी आज, बुधवारी संपावर आहेत. त्यांना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे पाठिंबा देण्यात आला.
कोल्हापूर : शासनाच्या कामगार व कर्मचारीविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी देशातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार व कर्मचारी आज, बुधवारी संपावर आहेत. त्यांना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे पाठिंबा देण्यात आला. संघटनेचे सरचिटणीस अनिल लवेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना भेट देऊन पाठिंब्याचे निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे, की देशव्यापी संपाचा निर्णय देशातील प्रमुख १० केंद्रीय कामगार संघटना व सर्व उद्योगांतील देशपातळीवरील स्वतंत्र संघटना यांच्या नवी दिल्लीत झालेल्या संयुक्त परिषदेत घेण्यात आला.
वाढती महागाई त्वरित रोखावी, रेशन व्यवस्था बळकट करावी, खासगीकरण व कंत्राटीकरणाचे धोरण रद्द करावे, बेरोजगारी रोखा व रोजगार वाढवा, कामगार व शेतकऱ्यांना किमान व पुरेशी पेन्शन मिळाली पाहिजे, कामगार कायदा बदलून कामगार हक्क हिरावणे बंद करा, सातवा वेतन आयोग लागू करावा, आदी विविध मागण्यांचा समावेश आहे.
शिष्टमंडळात संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत डावरे, महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष विलास कुरणे, संजय क्षीरसागर, प्रकाश पाटील, रमेश पाटील, स्नेहल जाधव, सुरेखा पोळ, अश्विनी कारंडे, अजय लुगडे, आदींचा समावेश होता.