कोल्हापूर : हाळवणकर यांच्या वीजचोरीतील दोषमुक्तीचा फेरविचार करा, सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश : याचिकाकर्ते व्हनुंगरे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 03:19 PM2018-01-12T15:19:26+5:302018-01-12T18:01:27+5:30
भाजपचे इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्या वीज चोरी प्रकरणातील दोषमुक्तीचा फेरविचार करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिल्याची माहिती याचिका कर्ते बालमुकूंद व्हनुंगरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : भाजपचे इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्या वीज चोरी प्रकरणातील दोषमुक्तीचा फेरविचार करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिल्याची माहिती याचिका कर्ते बालमुकूंद व्हनुंगरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
वीज चोरी प्रकरणी इचलकरंजी येथील विशेष सत्र न्यायाधीशांनी सुरेश हाळवणकर व त्यांचे बंधू महादेव हाळवणकर वीज चोरी व वीज मीटर मधील फेरफार प्रकरणी मे २०१४ मध्ये दोषी ठरविले होते. तीन वर्षाचा सश्रम तुरूंगवास व दहा हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याविरोधात हाळवणकर यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
न्यायालयाने त्यांच्या दोषत्वाला स्थगिती दिली होती. याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायमुर्ती अरूण मिश्रा व न्यायमुर्ती मोहन एम. शांतागोडर यांच्या खंडपीठापुढे ४ जानेवारीला सुनावणी झाली. |
दोषत्वाला स्थगिती देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निकालाबाबत नापसंती व्यक्त करत सहा आठवड्यात स्थगितीचा फेरविचार करावा. असे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिल्याचे व्हनुंगरे यांनी सांगितले.
वीज चोरी हा सामान्य गुन्हा नसून गंभीर सामाजिक अपराध असल्याचे सांगत दोषत्वास स्थगिती देता येणार नाही. भावाचे नावे हाळवणकर यांनी केलेला भाडे करार नोंदणीकृत नाही. दोषत्वातून मुक्त होण्यासाठी केलेला बनाव असल्याचे अॅड. अंकुर गुप्ता व अॅड. प्रवीण सटाले यांनी न्यायालयात मांडल्याचेही व्हनुंगरे यांनी माहिती दिली.