कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणाची पाहणी; गुरुवारी सुनावणी, चार ठिकाणीचे घेतले सांडपाण्याचे नमुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 05:39 PM2018-01-17T17:39:13+5:302018-01-17T17:45:19+5:30
कोल्हापूर शहरातील विविध नाल्यांतून मिसळणाऱ्या सांडपाण्यापासून होणारे पंचगंगा नदीचे प्रदूषण किती प्रमाणात आहे, याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पाहणी करून चार ठिकाणचे सांडपाण्याचे नमुनेही घेतले.
कोल्हापूर : शहरातील विविध नाल्यांतून मिसळणाऱ्या सांडपाण्यापासून होणारे पंचगंगा नदीचे प्रदूषण किती प्रमाणात आहे, याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पाहणी करून चार ठिकाणचे सांडपाण्याचे नमुनेही घेतले.
सांडपाण्यामुळे होणाऱ्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणास जबाबदार धरून महानगरपालिका प्रशासनावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्याचाच एक भाग म्हणून हे नमुने घेण्यात आले. दरम्यान, गुरुवारी करवीर तहसीलदार यांच्यासमोर यासंदर्भात सुनावणी होणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शहरातील सर्व सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत असून काही नाले अडवून त्यातील सांडपाणी ‘एसटीपी’कडे वळविण्याचे कामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे नदीच्या पाण्याचे प्रदूषण वाढले असल्याबाबत येथील प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे.
त्याअनुषंगाने विभागीय आयुक्तांनी पंचगंगा नदीच्या प्रदूषणास जबाबदार धरून महानगरपालिकेवर ‘कलम १३३’प्रमाणे कारवाईचे आदेश दिले आहेत. या कारवाईचाच एक भाग म्हणून तक्रारदार यांच्या समक्ष बुधवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील जयंती, दुधाळी, कसबा बावडा, बापट कॅम्प येथील चार नाल्यांचे सांडपाणी तसेच नदीपात्रातील पाण्याचे नमुने घेतले.
यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी राजेश कामत, कडले, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते उदय गायकवाड, महापालिका पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे उपस्थित होते.
गुरुवारी करवीर तहसीलदार यांच्यासमोर प्रदूषणासंदर्भात सुनावणी होणार आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर कारवाईचे स्वरूप ठरणार आहे.