कोल्हापूर : मुंबईतील सराफ व्यापार लूटमार केल्याप्रकरणी संशयितांचा सुगावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 08:02 PM2018-02-08T20:02:14+5:302018-02-08T20:07:02+5:30
मुंबईतील सराफ व्यापाऱ्याच्या चाळीस लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची लूटमार केल्याप्रकरणी पोलिसांना संशयितांचा सुगावा लागला आहे. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेल्या कारभोवती तपासाची चक्रे फिरत आहेत. त्या दृष्टीने तपास सुरू आहे.
कोल्हापूर : मुंबईतील सराफ व्यापाऱ्याच्या चाळीस लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची लूटमार केल्याप्रकरणी पोलिसांना संशयितांचा सुगावा लागला आहे. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेल्या कारभोवती तपासाची चक्रे फिरत आहेत. त्या दृष्टीने तपास सुरू आहे. त्यासाठी एक पथक मुंबईला गेले आहे. त्यामुळे लवकरच या लूटमारीचा उलगडा होण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुरुवारी वर्तविली आहे.
मुंबईतील सराफ व्यापारी कांतिलाल मेहता (वय ५३, रा. गोकुळ को-आॅप. हौसिंग सोसायटी, एम. जी. रोड, बोरिवली, पूर्व) हे मुंबईहून कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानक येथे खासगी आरामबसने बुधवारी (दि. ७) सकाळी आले. तेथून ते रिक्षाने गुजरी येथे आले.
रिक्षातून उतरून ते गुजरीतील मरुधन भवन या यात्री निवाससमोर आले असता अचानक मेहता यांच्या पाठीमागून दोघे संशयित तरुण आले. मेहता यांना बंदुकीचा धाक दाखवीत बांबूच्या काठीने मारहाण केली. यावेळी समोरूनही दोघे तरुण आले.
या चौघांनी मेहता यांना बेदम मारहाण करीत त्यांच्या हातातील बॅग हिसकावून घेतली व कपिलतीर्थ मार्केटच्या दिशेने ते पसार झाले. याबाबत जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी गुजरी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज घेतले.
दरम्यान, या गुन्ह्यात संशयितांनी कार वापरल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी सात पथके स्थापन केली आहेत. त्यांतील एक पथक मुंबईला गेले आहे. या कारचा नंबर, ही कार कोठून आली, याची माहिती पोलीस घेत आहेत.
दोन तास अगोदर टेहळणी
सराफ व्यापारी कांतिलाल मेहता हे कोल्हापुरात येण्यापूर्वी संशयित आरोपी हे घटनेअगोदर दोन तास कोल्हापुरात आले होते. त्यांनी कोल्हापूर शहराची टेहळणी केली. घटनेअगोदरचे व त्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असल्याचे समजते. त्यामुळे लूटमार केल्यानंतर संशयित कोणत्या मार्गाने गेले आहेत, याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.