कोल्हापूर : पिस्तूल प्रकरणी दिंडनेर्लीतील स्वप्निल शिंदेला अटक, ‘लोकमत’च्या दणक्याने कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:17 PM2018-12-03T12:17:19+5:302018-12-03T12:18:35+5:30
देशी बनावट पिस्तुलाचा मालक दुसरा-तिसरा कोणी नसून दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील खासगी सावकार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी रविवारी संशयित स्वप्निल श्रीकांत शिंदे (वय ५२) याच्या मुसक्या आवळल्या.
कोल्हापूर : देशी बनावट पिस्तुलाचा मालक दुसरा-तिसरा कोणी नसून दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील खासगी सावकार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी रविवारी संशयित स्वप्निल श्रीकांत शिंदे (वय ५२) याच्या मुसक्या आवळल्या.
पिस्तूल बाळगल्याप्रकरणी संशयित प्रवीण बंडू गुरव (२९, रा. येवती, ता. करवीर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. त्याच्याजवळ असलेले पिस्तूल हे दिंडनेर्ली येथील एका खासगी सावकाराचे असून, पोलीस या तपासाला बगल देत राजकीय दबावाखाली ‘त्या’ सावकाराला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.
या वृत्ताची दखल पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घेऊन, सखोल चौकशी करून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार शिंदेवर पोलिसांनी कारवाई केली.
दिंडनेर्ली येथे संशयित प्रवीण गुरव याच्या कब्जात हुबेहूब इंग्लिश बनावटीसारखे दिसणारे देशी बनावटीचे पिस्तूल मिळून आल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्याला २९ नोव्हेंबरला पकडले होते.
हे पिस्तूल स्वप्निल शिंदेचे होते. गुरव हा त्याच्याकडे जेसीबी यंत्रावर चालक आहे. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. तो गुन्हेगारी वृत्तीचा नाही. त्याचा कोणाशी वादही नाही. त्याने शिंदेकडून दीड लाख रुपये कर्ज घेतले होते.
शिंदेला वाचविण्यासाठी गुरवने पिस्तूल आपल्या कब्जात घेतले आणि स्वत: आरोपी झाल्याची येवती, दिंडनेर्ली परिसरात जोरदार चर्चा सुरू होती. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पिस्तूलमालक सावकाराचा खरा चेहरा पुढे आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले.
त्यानंतर शिंदेच्या मुसक्या आवळल्या. त्याने हे पिस्तूल कोठून खरेदी केले याचा तपास इस्पुर्लीचे सहायक पोलीस निरीक्षक तृप्ती देशमुख करीत आहेत.