कोल्हापूर : तालुका, शाळापातळीवर होणार ‘मोबाईल’वरील कलचाचणीचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 06:20 PM2018-11-30T18:20:17+5:302018-11-30T18:22:02+5:30
यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी मोबाईलवर घेतली जाणार आहे. त्याबाबत कोल्हापूर आणि कोकण विभागांतील तालुकापातळीवरील प्रत्येक दोन शिक्षकांना शुक्रवारी कोल्हापुरात मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर आता तालुका आणि शाळापातळीवर शिक्षकांना या चाचणीबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्यक्ष कलचाचणी दि. १८ डिसेंबर ते २० जानेवारीदरम्यान घेण्यात येणार आहे.
कोल्हापूर : यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी मोबाईलवर घेतली जाणार आहे. त्याबाबत कोल्हापूर आणि कोकण विभागांतील तालुकापातळीवरील प्रत्येक दोन शिक्षकांना शुक्रवारी कोल्हापुरात मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर आता तालुका आणि शाळापातळीवर शिक्षकांना या चाचणीबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्यक्ष कलचाचणी दि. १८ डिसेंबर ते २० जानेवारीदरम्यान घेण्यात येणार आहे.
येथील दादासाहेब मगदूम हायस्कूलमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यासाठी कलमापन चाचणीच्या राज्य समन्वयक पल्लवी देव, शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव टी. एल. मोळे, कोकण विभागीय सचिव भावना राजनूर, पुणे येथील ‘श्यामची आई’ फौंडेशनचे सुशांत खड्ड, प्रणव पेंडसे प्रमुख उपस्थित होते. राज्य समन्वयक देव म्हणाल्या, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही कलचाचणी महत्त्वाची आहे. यावर्षी ती मोबाईलद्वारे घेतली जाणार आहे.
ही चाचणी शिक्षकांनी आनंददायी आणि तणावमुक्त वातावरणामध्ये पार पडावी. विभागीय सचिव मोळे यांनी कलचाचणीचा उद्देश आणि नव्या पद्धतीबाबतच्या प्रशिक्षणाच्या टप्प्यांची माहिती दिली. सुशांत खड्ड आणि प्रणव पेंडसे यांनी चाचणीसाठीच्या मोबाईल अॅपची माहिती दिली.
त्यांनी आॅनलाईन आणि आॅफलाईन पद्धतीने चाचणी कशी घ्यावयाची याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी दादासाहेब मगदूम हायस्कूलचे मुख्याध्यापक बसवराज वस्त्रद यांच्यासह कोल्हापूर, कोकण विभागांतील माहिती तंत्रज्ञान विषयाचे, अविरत उपक्रमाचे प्रशिक्षण पूर्ण केलेले शिक्षक उपस्थित होते.
कोल्हापूर विभागात दीड लाख विद्यार्थी
यावर्षी कोल्हापूर विभागातून सुमारे दीड लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. त्यांची प्रत्यक्ष कलचाचणी दि. १८ डिसेंबरपासून सुरू होईल. त्यापूर्वी तालुकापातळीवरील शिक्षकांना हे प्रशिक्षण दि. ७ ते १५ डिसेंबरदरम्यान आणि त्यानंतर शाळापातळीवर दिले जाणार असल्याचे मोळे यांनी सांगितले.