कोल्हापूर : ‘एफआरपी’ थकविणाऱ्यां कारखान्यांवर कारवाई करा, शिवसेनेची साखर सह संचालकांकडे मागणी : डिसेंबरअखेर ३३५ कोटी प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 05:52 PM2018-01-08T17:52:59+5:302018-01-08T18:10:18+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यांकडे डिसेंबर २०१७ अखेर ३३५ कोटी रुपये थकीत एफआरपी असून, संबंधित कारखान्यांवर कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे सोमवारी केली.
कोल्हापूर : जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यांकडे डिसेंबर २०१७ अखेर ३३५ कोटी रुपये थकीत एफआरपी असून, संबंधित कारखान्यांवर कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे सोमवारी केली.
शुगर केन कंट्रोल आॅर्डर १९९६ प्रमाणे शेतकऱ्यांचा ऊस गाळप केल्यानंतर १४ दिवसांत उसाचे पैसे त्याच्या खात्यावर वर्ग केले पाहिजेत, अन्यथा संबंधित कारखान्यांवर फौजदारी दाखल करता येते. साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले.
डिसेंबर २०१७ अखेर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ४१ लाख ८२ हजार ८८ लाख टनांचे गाळप केले आहे. गाळप केलेल्या उसाचे एफआरपीप्रमाणे ११३९ कोटी सहा लाख रुपये शेतकऱ्यांना देय रक्कम आहे. आतापर्यंत ८०४ कोटी ४८ लाख ८२ हजार रुपये कारखान्यांनी दिले आहेत; पण अद्याप ३३५ कोटी रुपये देय आहे.
महागडी खते, वीजदरामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. भांडवलदारांच्या व्यापातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
शेतकऱ्यांनी आता बघायचे कोणाकडे? असा सवाल करत आपणही साखर कारखानदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केला. शेतकऱ्यांच्या देय रकमेबाबत दोन दिवसांत साखर आयुक्त पुणे येथे बैठक घेऊन शेतकऱ्यांना पैसे द्यावेत, अशी मागणीही देवणे यांनी केली.
दर पंधरवड्याला एफआरपीचा आढावा कार्यालयामार्फत घेण्यात येतो. ज्यांनी एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत, त्याबाबतचा अहवाल साखर आयुक्तांकडे पाठविला जातो. त्यानुसार आयुक्त कार्यालयाकडून संबंधित कारखान्यांची सुनावणी घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावल यांनी सांगितले.
शिष्टमंडळात उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव पाटील, राजू यादव, धनाजी यादव, प्रवीण पालव, भरत चव्हाण, बाजीराव पाटील, अमित नेर्लेकर, महेश नलवडे, चंद्रकांत भोसले, कुमार पाटील, आदी उपस्थित होते.
डिसेंबर २०१७ अखेर देय एफआरपी :
कारखान्याचे नाव एकूण एफआरपी दिलेली एफआरपी थकीत
भोगावती ४१ कोटी ६८ लाख २१ कोटी ३७ लाख २० कोटी ३१ लाख
राजाराम ४० कोटी ५२ लाख ११ कोटी ५० लाख २९ कोटी १लाख
शाहू ६३ कोटी ७२ लाख ३७ कोटी ६ लाख २६ कोटी ६५ लाख
बिद्री ५० कोटी ६० लाख २८ कोटी १९ लाख २२ कोटी ४० लाख
आप्पासाहेब नलवडे ३२ कोटी ३२ लाख २४ कोटी ९९ लाख ७ कोटी ३२ लाख
जवाहर १२० कोटी ९० लाख ७३ कोट ९७ लाख ४६ कोटी ९२ लाख
मंडलिक ४३ कोटी ५४ लाख २८ कोटी ७० लाख १४ कोटी ८३ लाख
कुंभी ५६ कोटी ४२ लाख ३२ कोटी ६१ लाख २३ कोटी ८१ लाख
वारणा ८४ कोटी १२ लाख १४ कोटी ६२ लाख ६९ कोटी ५० लाख
गायकवाड ३० कोटी ३५ लाख ४ कोटी ३८ लाख २५ कोटी ९६ लाख
घोरपडे ७५ कोटी ७ लाख ४९ कोटी ९३ लाख २५ कोटी १३ लाख