कोल्हापूर : घोरपडे कारखान्यावर कारवाई करू, प्रदूषण मंडळाची शिवसेना शिष्टमंडळाला ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:50 AM2018-11-13T11:50:42+5:302018-11-13T13:00:46+5:30
कागल तालुक्यातील संताजी घोरपडे साखर कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणाची जाग्यावर जाऊन पाहणी केली आहे. जल प्रदूषण कायद्यांतर्गत कारखान्यावर उचित कारवाई करू, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी नागेश लोहळकर यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिली.
कोल्हापूर : कागल तालुक्यातील संताजी घोरपडे साखर कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणाची जाग्यावर जाऊन पाहणी केली आहे. जल प्रदूषण कायद्यांतर्गत कारखान्यावर उचित कारवाई करू, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी नागेश लोहळकर यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिली.
कारखान्याचे दूषित पाणी नदीत मिसळत असल्याबद्दल सोमवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रदूषण नियंत्रण कार्यालयास भेट देऊन कारखान्यावर कारवाईची मागणी केली. यावेळी संभाजी भोकरे, अविनाश शिंदे, अशोक पाटील, शिवगोंडा पाटील, चंद्रकांत भोसले, आदी उपस्थित होते.
नोकरी धोक्यात घालतो; पण .....
शिष्टमंडळाने प्रश्नांचा भडिमार केल्यानंतर, मीही सामान्य माणूस आहे, मलाही वेदना होतात. नोकरी धोक्यात घालून कारखाना बंद करण्याची कारवाई करतो. आधी कारवाई करतो, मग वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवितो, असे लोहळकर यांनी सांगितले.
लोहळकरांचे ‘धन्यवाद आणि जयहिंद’
लोहळकर यांनी पहिल्यांदा कारखाना बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पंधरा मिनिटांत घूमजाव केल्याने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे गोंधळून गेलेल्या लोहळकर यांनी प्रतिनिधींना ‘धन्यवाद, जयहिंद’ म्हणत हात जोडले.