कोल्हापूर : चुकीचा घरफाळा आकारणाऱ्यांवर कारवाई करा, ठाणेकर यांची आयुक्तांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 03:26 PM2018-10-11T15:26:28+5:302018-10-11T15:28:47+5:30
घरफाळ्याची खोटी कर आकारणी करुन नागरीकांना मनस्ताप देणाऱ्या तसेच महापालिकेचे नुकसान आणि बदनामी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजप नगरसेवक अजित ठाणेकर यांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली आहे.
कोल्हापूर : घरफाळ्याची खोटी कर आकारणी करुन नागरीकांना मनस्ताप देणाऱ्या तसेच महापालिकेचे नुकसान आणि बदनामी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजप नगरसेवक अजित ठाणेकर यांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली आहे.
यासदर्भात ठाणेकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ए वॉर्ड सि.स.नं. १४५९/१/२ या क्रमांकावर दगड, विटा, मातीची व साध्या कौलारु बांधकामाची ८७८ स्केअर फुट क्षेत्राची जुनी इमारत असून या मिळकतीचे मुळ मालक तुकाराम हरी शिंदे होते.
मिळकतीस ६१० रुपये घरफाळा येत होता. घर मालकाने एका कुळासोबत १९९४ मध्ये कुळ रहात असलेल्या हिस्सा त्यांना खरेदी देण्याच्या उद्देशाने करारपत्र केले. परंतु आजअखेर करार पूर्ण झालेला नाही. त्यामुळे ही इमारत मुळ मालकाच्या नावावरच आहे. तरीही या मिळकतीचे कोणाचीही मागणी नसताना सन २००४ मध्ये विभाजन करुन कुळाची भोगवटादार म्हणून नोंद केली व दुसरे बील तयार केले.
सदर कुळाकडे १७ हजार रुपये घरफाळा आकारणी केली. केवळ ३२१ स्केअर फुट हिश्शास इतकी कर आकारणी होणे अवाजवी आहे. आजरोजी कुळास १८ हजार २२० इतकी वार्षिक आकारणी होत असून चालू मागणीसह २ लाख ५९ हजार ९८९ इतकी थकबाकी दिसत आहे.
मिळकतीला लागू झालेली अन्यायी घरफाळा आकारणी ताबडतोब रद्द करुन घ्यावी व योग्य आकारणीचे बील मिळकतधारकास तातडीने देण्यात यावे, तसेच चुकीच्या पध्दतीने घरफाळा आकारणी करुन महापालिकेची बदनामी व नुकसान करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, असेही ठाणेकर यांनी म्हटले आहे.