कोल्हापूर :  परवानगीशिवाय काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:04 PM2018-10-17T12:04:01+5:302018-10-17T12:07:09+5:30

कोल्हापूर शहरात टाकण्यात येत असलेल्या भूमिगत विद्युत वाहिनी आणि एलईडी पथदिवे बसविण्यावरून मंगळवारी झालेल्या महानगरपालिका सभेत प्रशासनाला धारेवर धरण्यात आले.

Kolhapur: Take action on contractor working without permission | कोल्हापूर :  परवानगीशिवाय काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा

कोल्हापूर :  परवानगीशिवाय काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा

Next
ठळक मुद्देपरवानगीशिवाय काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करामहापालिका सभेत मागणी : नुकसान भरपाई घेणार

कोल्हापूर : शहरात टाकण्यात येत असलेल्या भूमिगत विद्युत वाहिनी आणि एलईडी पथदिवे बसविण्यावरून मंगळवारी झालेल्या महानगरपालिका सभेत प्रशासनाला धारेवर धरण्यात आले.

ज्या कामांना अद्याप परवानगीच दिली नाही ते काम शहरात कसे सुरू झाले, रस्ते खराब करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई का केली नाही, अशा प्रश्नांची सरबत्ती यावेळी करण्यात आली. रस्त्यांचे झालेले नुकसान संबंधित ठेकेदाराकडून भरून घ्यावे, अशा सक्त सूचना प्रशासनास देण्यात आल्या. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंद्रे होत्या.

कोल्हापूर शहरात केंद्र सरकारमार्फत एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्यासाठी महावितरण सोबत सामंजस्य करार करण्यास मान्यता व्हावी, म्हणून मंगळवारच्या सभेसमोर प्रस्ताव आला होता. हा प्रस्ताव बराच वेळ झालेल्या चर्चेनंतर उपसूचनेसह मंजूर करण्यात आला; परंतु याप्रकरणी सभागृहात शारंगधर देशमुख, भूपाल शेटे, विजय सूर्यवंशी, जयंत पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

ज्या कामास अद्याप सभागृहाने मान्यता दिली नाही, त्या भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम ठेकेदाराने परस्पर सुरू करून अनेक रस्त्यांचे नुकसान केले, यासंदर्भात कारवाई करा अशा सूचना देऊनदेखील संबंधितांवर का कारवाई केली नाही, अशी विचारणा शारंगधर देशमुख यांनी केली.

परवानगी घेतल्याशिवाय काम सुरू केल्याबद्दल ठेकेदारावर फौजदारी करा, अशी सूचना भूपाल शेटे यांनी केली. महासभेने मान्यता दिली नसतानाही कामास सुरुवात केली असल्याने ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे, असा आग्रह विजय सूर्यवंशी यांनी धरला.

त्यावर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी खुलासा केला. भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम महावितरणतर्फे सुरू होते. जेव्हा काम सुरू झाल्याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांना नोटीस देण्यात आली आहे. परवानगीशिवाय काम करू नये, असे ठेकेदारास बजावले असून सध्या काम बंद आहे, असे सरनोबत यांनी सांगितले; मात्र त्याला सदस्यांनी आक्षेप घेतला.

यापूर्वी काम केले आहे, रस्ते खराब केले आहेत. त्याच्याकडून डिपॉझिट भरून घ्या. गरीब ठेकेदारांवर जर कारवाई केली जात असेल, तर या ठेकेदारांवरसुद्धा कारवाई का केली नाही. तो का जावई आहे का? अशी विचारणा देशमुख यांनी केली.

ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल : आयुक्त

२२ कोटी रुपये खर्च करून ३५ कि. मी. भूमिगत विद्युत वाहिनी टाकली जाणार आहे. केंद्र सरकारचा हा उपक्रम असून, महावितरणमार्फत हे काम होणार आहे. विनापरवाना काम केल्याबद्दल ठेकेदारास नोटीस देण्यात आली आहे. दंडात्मक कारवाई करण्यात येईल. रस्ते खुदाई झाल्यानंतर तो रस्ता तयार करून घेतला जाईल, असे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले.

शहरात एलईडी बसविण्याचा निर्णय

कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत २५ हजारांहून अधिक एलईडी पथदिवे बसविण्याकरिता केंद्र सरकार पुरस्कृत ‘ईईएसएल’ या कंपनीसोबत करार करण्यास सभेत मान्यता देण्यात आली; मात्र यावेळी काही सदस्यांनी शंका उपस्थित केल्या.

किती पथदिवे लावणार, त्याची देखभाल कोण करणार, शहरात आणखी पथदिवे लावण्याबाबत मागणी झाली, तर त्याची पूर्तता होणार का? आदी शंकांना आयुक्त चौधरी तसेच शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी उत्तरे दिली. कराराचा मसुदा सर्व सदस्यांना दाखवा, त्यात आमच्या काही सूचना असतील, तर त्यांचा समावेश करावा, अशी सूचना शारंगधर देशमुख यांनी केली.

करार करण्यापूर्वी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांमार्फ त नगरसेवकांना प्रेझेंटेशन सादर करायला लावू. पथदिवे कोणत्या ठिकाणी किती क्षमतेचे लावायचे यावरही चर्चा केली जाईल. शहरात सर्वत्र योग्य क्षमतेचे पथदिवे लावले जातील, असे आयुक्तांनी सांगितले.

विद्युत विभागाच्या कारभाराचे वाभाडे

भुयारी विद्युत वाहिनी, एलईडी पथदिवे यावर रेंगाळलेली चर्चा नंतर विद्युत विभागावर घसरली. शहरात अनेक ठिकाणी ट्युबलाईट नाहीत, चोकअप नाहीत, साहित्य खरेदी केलेले नाही याकडे नियाजखान यांनी या विभागाचे वाभाडे काढले. कर्मचाऱ्यांना सांगूनही सहा-सहा महिने ट्युबलाईट बसविल्या जात नाही, अनेक ठिकाणी अंधार पडला आहे त्याला जबाबदार कोण? अशी विचारणाही त्यांनी केली.

अभिजित चव्हाण यांनीही त्यांच्या भागात अनेक ठिकाणी लाईटची व्यवस्था नसल्याचे तसेच तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. या विभागाचे काम अतिशय निष्काळजी असून, सकाळी नऊ वाजेपर्यंत दिवे बंद केले जात नसल्याची तक्रार तौफिक मुल्लाणी यांनी केली. या चर्चेत हस्तक्षेप करताना महापौर बोंद्रे यांनी दोन दिवसांत शहरातील सर्व बंद असलेल्या लाईट दुरुस्त कराव्यात, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

 

Web Title: Kolhapur: Take action on contractor working without permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.