कोल्हापूर : ‘गोकुळ’ची सभा विस्तारित जागेत घ्या, बचाव समितीची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 06:43 PM2018-08-25T18:43:51+5:302018-08-25T18:45:12+5:30
‘गोकुळ’ दूध संघाची २१ सप्टेंबरला होणारी सभा विस्तारित जागेत घ्यावी, अशी मागणी ‘गोकुळ’ बचाव समितीने शनिवारी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे केली.
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाची २१ सप्टेंबरला होणारी सभा विस्तारित जागेत घ्यावी, अशी मागणी ‘गोकुळ’ बचाव समितीने शनिवारी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे केली.
संघाची सभा ताराबाई पार्क येथे होते. संघाचे हजारो सभासद सभेसाठी येत असल्याने गर्दी उसळून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे निम्म्याहून अधिक सभासद सभा मंडपाच्या बाहेर रस्त्यावरच उभे राहतात. व्यासपीठापर्यंत पोहोचता न आल्याने अनेक सभासदांना प्रश्न न विचारताच परतावे लागते.
यासाठी संघाची सभा खुल्या व विस्तारित जागेत घ्यावी. जेणेकरून संघाच्या सर्व सभासदांना त्यात सहभाग घेता येईल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही उद्भवणार नाही, अशी मागणी शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांकडे केली.
त्याचबरोबर विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर व सहायक निबंधक (दुग्ध) गजेंद्र देशमुख यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, करवीरचे माजी सभापती प्रदीप झांबरे, रावसाहेब पाटील, विद्याधर गुरबे, सचिन घोरपडे, आदी उपस्थित होते.