कोल्हापूरला लागतात दरमहा आठ लाख ‘डॉलर’
By Admin | Published: April 26, 2015 01:07 AM2015-04-26T01:07:57+5:302015-04-26T01:07:57+5:30
मागणीत मोठी वाढ : परदेशात जाणाऱ्यांचा वाढता ओघ; पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्याही वाढली
विश्वास पाटील / कोल्हापूर
कोल्हापुरातील लोकांचे पर्यटनासह विविध कामांच्या निमित्ताने विदेशी दौऱ्यावर जाण्याचे प्रमाण वाढले असल्याने दरमहा आठ लाख डॉलर चलनाची खरेदी केली जात आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात जसा डॉलरचा भाव वधारतो, तशी कोल्हापुरातील डॉलरची मागणीही दिवसें-दिवस वधारत असल्याचा अनुभव येत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
साधारणत: २००० सालापर्यंतचे चित्र असे होते की परदेशात जाणे म्हणजे खूपच काही तरी मोठे केल्यासारखे मानले जाई. त्यावेळी दरमहा कसेबसे दहा-बारा लोक परदेशात जात असत. त्यातही उद्योजकांचीच संख्या जास्त होती. पर्यटनासाठी म्हणून विदेशात जाणे लोकांना फार चैन केल्यासारखे वाटे, परंतु आता स्थिती बरीच बदलली आहे. उद्योगधंद्यांशी संबंधित जेवढे लोक विदेशात जातात, त्याहून जास्त लोक पर्यटनाला जात आहेत. दुबई, थायलंड, सिंगापूरला जाणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. उद्योगधंद्यांशी संबंधित लोक मुख्यत: युरोप व चीनला जातात. त्या देशांमध्ये होणाऱ्या औद्योगिक प्रदर्शनांना भेटी देऊन नवे तंत्रज्ञान जाणून घेण्याची आस उद्योजकांमध्ये जास्त आहे.
याशिवाय हल्ली खासगी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर विदेशी सहलींचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जात आहे. डॉक्टर, मेडिकल रिप्रेझिंटिव्ह यांच्यासाठी औषध कंपन्या असेच दौरे आखतात.
त्यामुळेही विदेशात जाणाऱ्यांची संख्या वाढल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. कोल्हापुरात बँक, प्रायव्हेट फॉरेन करन्सी एक्स्चेंज डिलर व ट्रॅव्हल्स एजन्सींकडे चलन विनिमय अधिकृत केंद्रे आहेत. ज्यांना फुल फ्लेज मनी चेंजर्स (एफएफएमसी) म्हटले जाते. कोल्हापुरात ट्रेंड विंग्ज, थॉमस अॅन्ड कुक, युएई एक्स्चेंज आणि रसिका ट्रॅव्हल्सकडे ही चलन विनिमयाची सोय उपलब्ध आहे. प्रतिदिन किमान ३० ते ३२ हजार डॉलरची विक्री या केंद्रातून होते. कोल्हापूरचा औद्योगिक विकास चांगला झाला असला तरी येथे अजून कॉर्पोरेट कंपन्या फारशा आलेल्या नाहीत. ‘किर्लोस्कर’, ‘मनुग्राफ’सारखे समूह आहेत परंतु त्यांची मुख्यालये मुंबईत आहेत. कॉर्पोरेट कंपन्या न येण्यामागे रखडलेली विमानसेवा हे महत्त्वाचे कारण आहे,अन्यथा हा व्यवसाय अजून मोठ्या प्रमाणात वाढण्याची संधी होती. इस्रायलमधील शेती प्रदर्शनासाठी जाण्यास शेतकरी खूप इच्छुक असतात परंतु शेतीच्या मालकीची कागदपत्रे उपलब्ध न होणे, मालकी ज्यांच्याकडे आहे, त्यांचा पासपोर्ट काढलेला नसणे अशा अडचणी येत आहेत. कोल्हापुरात सध्या दहाहून जास्त देशांची करन्सी सहजपणे मिळू शकते. पूर्वकल्पना दिल्यास आणखी किमान पंधरा देशांची करन्सी उपलब्ध करून दिली जाते. या व्यवहारावरही थेट रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण आहे. दरमहा सात तारखेला या सगळ््या व्यवहारांची रिझर्व्ह बँकेकडून छाननी केली जाते. कोल्हापुरात दरमहा पाचशेहून अधिकजण पासपोर्ट काढून घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.