कोल्हापूर : तासगाव कारखान्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलू, एन. डी. पाटील यांना सहकारमंत्र्यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 05:23 PM2018-05-18T17:23:19+5:302018-05-18T17:23:19+5:30
तासगाव-पलूस सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याबाबत आपण जातीने लक्ष घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलू, अशी ग्वाही राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. या मुद्द्यावर ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी शुक्रवारी सकाळी देशमुख यांची कोल्हापूरच्या विश्रामगृहावर भेट घेतली. त्यावेळी त्यांनी प्रा. पाटील यांना आश्वस्त केले.
कोल्हापूर : तासगाव-पलूस सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याबाबत आपण जातीने लक्ष घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलू, अशी ग्वाही राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. या मुद्द्यावर ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी शुक्रवारी सकाळी देशमुख यांची कोल्हापूरच्या विश्रामगृहावर भेट घेतली. त्यावेळी त्यांनी प्रा. पाटील यांना आश्वस्त केले.
हा कारखाना गेले पाच हंगाम बंद आहे. कारखान्याची एका कंपनीला झालेली विक्रीही लढ्यानंतर रोखण्यात आली. कारखान्याचा ताबा राज्य बॅँकेकडे ताबा आहे; परंतु विक्री रद्द झाल्यानंतर पुढे तो सभासदांची मालकी ठेवून चालवायला देणे, भाडेतत्त्वावर देणे यासाठी राज्य बॅँकेने काहीही केलेले नाही.
या पार्श्वभूमीवर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक आर. डी. पाटील आणि कारखाना बचाव समितीचे संजय संकपाळ-पाटील यांना सोबत घेऊन प्रा. एन. डी. पाटील यांनी देशमुख यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली.
तासगाव आणि पलूस या दोन तालुक्यांतील १०३ गावे कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये असून, रोज २७५० टन गाळप क्षमता आहे. पाच ते सहा लाख टन ऊस बैलगाडीने येण्याजोगा आहे.
या पार्श्वभूमीवर यंदाच्या हंगामाला अजूनही चार महिन्यांचा अवधी आहे. किमान या हंगामापासून तरी हा कारखाना सुरू व्हावा, यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रा. पाटील यांनी मंत्र्यांना आवाहन केले. त्यावर देशमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.