कोल्हापूर : गौरवाड ग्रामस्थांकडून ‘तिरडी मोर्चा’, आश्वासन मिळाल्याने ठिय्या आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 08:37 PM2018-08-16T20:37:04+5:302018-08-16T20:40:01+5:30
कोल्हापूर : गौरवाड (ता. शिरोळ) हे गाव पूर्णपणे देवस्थानच्या जमिनीवर आहे, त्यामुळे गावातील विकास कामे करण्यासाठी परवानगी व हद्दवाढीसाठीही मंजुरी, आदी मागण्यांसाठी ग्रामस्थांच्यावतीने मंगळवार (दि. १४) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
याची दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकारच्या विरोधात प्रतीकात्मक ‘तिरडी मोर्चा’ काढून निषेध व्यक्त केला. यावेळी जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनंतर शनिवारी ( दि. २५ आॅगस्ट) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन मिळाल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
दुपारी दोनच्या सुमारास सर्व आंदोलक दसरा चौकात जमले. या ठिकाणी सरकारची प्रतीकात्मक तिरडी करण्यात आली. यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. याठिकाणी घोषणाबाजी करीत ठिय्या मारण्यात आला. दरम्यान, आंदोलकांना चर्चेला पाचारण करण्यात आले.
यावेळी हातकणंगलेचे प्रांताधिकारी समीर शिंगटे व शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव उपस्थित होते. त्यांनी हा प्रश्न धोरणात्मक असून, त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. २५) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
तसे पत्र शुक्रवारी दिले जाणार आहे. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
आंदोलनात सरपंच सलिम मुल्ला, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष दिगंबर सकट, सुनील भोसले, रविकांत जगताप, संध्या मधाळे, आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.