कोल्हापूर : त्यांचीही दिवाळी थाटामाटात, बालकल्याण संकुल; मुलांचा आनंद द्विगणित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 12:34 PM2018-11-09T12:34:07+5:302018-11-09T12:36:00+5:30
सेवाभावी वृत्तीने वंचितांचा आधार बनलेले बालकल्याण संकुल... आई-वडील आणि नातेवाईक नसलेली अशी तिथे राहणारी मुले-मुली या संकुलालाच आपले सर्वस्व मानून यंदाही इथे मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी करीत आहेत. समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्था पुढाकार घेऊन त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करीत आहेत.
कोल्हापूर : सेवाभावी वृत्तीने वंचितांचा आधार बनलेले बालकल्याण संकुल... आई-वडील आणि नातेवाईक नसलेली अशी तिथे राहणारी मुले-मुली या संकुलालाच आपले सर्वस्व मानून यंदाही इथे मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी करीत आहेत. समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्था पुढाकार घेऊन त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करीत आहेत.
मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलामध्ये अनाथ, निराधार अशी सुमारे २३५ मुले-मुली आहेत. यांतील काहींना आपले आई-वडील, नातेवाइकांबाबत काहीच माहीत नाही. त्यामुळे घरची दिवाळी त्यांच्या नशिबातच नाही. या मुलांनाही दिवाळीचा आनंद लुटता यावा, यासाठी बालकल्याण संकुल, दानशूर व्यक्ती व संस्थांच्या पुढाकाराने मोठ्या उत्साहात येथे दिवाळी साजरी केली जात आहे.
दीपावलीनिमित्त मुलांनी या परिसरात मातीचा किल्ला तयार केला आहे. त्यावर ठेवण्यासाठी सैनिकांच्या मातीच्या प्रतिकृतीही त्यांना कुणी भेट म्हणून दिल्या आहेत; तर काहींनी संकुलात आकाशदिवे लावणे, विद्युतमाळा लावणे, रांगोळी काढण्यासाठी पुढाकार घेऊन परिसर सजविल्याने दिवाळीचे वातावरण तयार झाले आहे. यामध्ये संकुलातील कर्मचारीही हिरिरीने सहभागी झाल्याने मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
यासाठी बालकल्याण संकुलाच्या मानद कार्यवाह पद्मजा तिवले, उपाध्यक्ष सुरेश शिपूरकर यांच्यासह अधीक्षक व कर्मचारी मुलांच्या या आनंदात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत.
सामाजिक दातृत्वातून संकुलातील मुले व मुलींना दरवर्षीप्रमाणे शिवाजी चौक तरुण मंडळ आणि काही दानशूर व्यक्तींनी नवीन कपडे भेट दिले आहेत. काही मुले दिवाळीनिमित्त सध्या नातेवाइकांकडे गेल्याने सध्या १५० मुले येथे वास्तव्यास आहेत.
टी. एम. कदम,
देणगी विभागप्रमुख, बालकल्याण संकुल
मुलांनीच तयार केला फराळ
बालकल्यास संकुलात दानशूर व्यक्तींकडून आलेला तयार फराळ न स्वीकारता, संकुलाच्या वतीने फराळासाठीचे साहित्यच स्वीकारले जात होते. स्वीकारलेल्या साहित्यातून संकुलातील आचारी व मुली स्वत:हून चकली, चिवडा, करंज्या, लाडू, आदी फराळ तयार करून त्याचा मनसोक्त आस्वादही घेत आहेत.
‘चेतना’ने दिली विशेष भेट
चेतना विकास मंदिरमधील विशेष मुलांनी येथील कार्यशाळेत खास दीपावलीनिमित्त पर्यावरणपूरक आकाशकंदील, उटणे, पणती अशा वस्तू तयार केल्या आहेत. यासह दिवाळीसाठी लहान आकाशकंदील, साबण, पणती, उटणे, सुगंधी द्रव्याची बाटली असा विशेष गिफ्ट बॉक्स या कार्यशाळेत तयार केल्याने, याला मोठी मागणी आहे. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासह, त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे.