कोल्हापूर : बसंत-बहार परिसरात चोरट्यांनी फलॅट, कार्यालय फोडले : दोघे चोरटे सीसीटीव्हीत कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 01:59 PM2018-11-21T13:59:36+5:302018-11-21T14:00:35+5:30
असेम्बली रोड, बसंत-बहार टॉकीज परिसरातील रॉयल हेरीटेज या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील ज्येष्ठ साहित्यीकाचा बंद फलॅट व सोसायटीचे कार्यालय चोरट्यांनी फोडून चोरीचा प्रयत्न केला.
कोल्हापूर : असेम्बली रोड, बसंत-बहार टॉकीज परिसरातील रॉयल हेरीटेज या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील ज्येष्ठ साहित्यीकाचा बंद फलॅट व सोसायटीचे कार्यालय चोरट्यांनी फोडून चोरीचा प्रयत्न केला. फलॅट आणि कार्यालयातही चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास दोघा चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे.
अधिक माहिती अशी, रॉयल हेरीटेज पाच मजली इमारत आहे. पहिल्या मजल्यावर साहित्यीक शरद राजाराम मेहता (वय ८०) यांचा फलॅट आहे. ते पत्नीसोबत राहतात. दिवाळी सुट्टीला ते बंगलुर येथील मुलाकडे राहण्यासाठी गेले आहेत. त्यांचा फलॅट बंद होता. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास त्याच्या शेजारी राहणारे सुहास चौगले हे कचरा बादली ठेवण्यासाठी दरवाजा उघडून गॅलरीत आले असता त्यांना पाहून दोघे चोरटे पळून गेले. त्यांनी चोर..चोर म्हणून आरडाओरड केली. सोसायटीतील लोक जागे होईपर्यंत चोरटे पसार झाले. चोरट्यांनी मेहता यांचा फलॅट आणि सोसायटीचे कार्यालय फोडलेले दिसून आहे. दोन्हीची लोखंडी दरवाजासह मुख लाकडी दरवाजाचे कडी-कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश करुन कपाटातील साहित्य विस्कटलेले दिसून आले.
सोसायटीमध्ये आठ सीसीटीव्ही कॅमरे आहेत. त्यातील एका कॅमेऱ्याची दिशा त्यांनी बदलेली होती. उर्वरीत सात कॅमेºयामध्ये चोरटे दिसून येत आहेत. ते नंदनवर्क पार्क येथून इमारतीकडे येताना दिसत आहेत. दोघांनी तोंडाला रुमाल बांधला होता. एकाच्या खांद्याला सॅक होती. परिसरात गणपती मंदीर आहे. त्याचे दर्शनही त्यांनी घेतले आहे. सोसायटीला सुरक्षा रक्षक नाही. प्रवेशद्वार उघडे असल्याने ते आतमध्ये घुसले. फलॅट आणि कार्यालय फोडून मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही. शेजारी राहणारे चौगले हे बाहेर आल्याने ते पळून गेले. मेहता यांच्या नातेवाईकांना चोरीची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी शाहुपूरी पोलीसांत नोंद झाली आहे.