कोल्हापूर : एटीएमवरून रोकड लंपास करणारे चोरटे हरियाणातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 11:27 AM2018-09-04T11:27:06+5:302018-09-04T11:29:26+5:30
शाहूपुरी ट्रेझरी येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशीनचे पॉवर स्वीच बंद-सुरू करून ५ लाख १० हजार रुपये परस्पर लंपास करणारी पाचजणांची टोळी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
कोल्हापूर : शाहूपुरी ट्रेझरी येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्याएटीएम मशीनचे पॉवर स्वीच बंद-सुरू करून ५ लाख १० हजार रुपये परस्पर लंपास करणारी पाचजणांची टोळी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही टोळी येथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ज्या खात्यावरून पैसे काढण्यात आले ते हरियाणातील नऊ खातेदार आहेत. त्यामुळे संशयित हे हरियाणातील असण्याची दाट शंका आहे. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सोमवारी दिली.
अधिक माहिती अशी, बसंत-बहार रोड परिसरात स्टेट बँक आॅफ इंडियाची ट्रेझरी शाखेच्या एटीएम मशीनचा विद्युत पुरवठा नियंत्रित करणारा पॉवर स्वीच चोरट्याने उचकटून मशीनमध्ये तांत्रिक बिघाड करून वेळोवेळी त्यातील सुमारे पाच लाख दहा हजार रुपये काढून घेतल्याचे उघडकीस आले.
एटीएमचा पॉवर सप्लाय बंद-सुरू करून त्यावरून पैसे काढून बँकेची फसवणूक करण्याचा कोल्हापुरात पहिलाच प्रकार घडल्याने बँक प्रशासनासह पोलीस चक्रावून गेले आहेत. यापूर्वी पुणे येथे अशाप्रकारे चोरट्यांनी एटीएममधून पैसे काढले होते.
पोलिसांनी एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता एकजण पैसे काढताना दिसत आहे. त्याच्या मागे चौघेजण आजूबाजूला पाळत ठेवत उभे असल्याचे दिसत आहे. एकजण बराच वेळ एटीएममध्ये थांबून आहे. तो येथील मशीनचे पॉवर स्वीच बंद-सुरू करतानाही दिसत आहे.
ज्या खात्यावरून चोरट्यांनी पैसे काढले त्याची माहिती घेतली असता सर्व खातेदार हे हरियाणा येथील असल्याचे निष्पन्न झाले. या सर्व खातेदारांची माहिती पोलिसांनी मागविली आहे. चोरटे हे परप्रांतिय असण्याची शंका पोलिसांना आहे. चोरटे बँकेच्या एटीएम सेंटरवरून बाहेर पडलेल्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत.
असे काढले पैसे
बँकेच्या एटीएम मशीनवर कार्ड स्वॅप करून घेतले. त्यानंतर खातेदाराचा पासवर्ड मारून रक्कम टाकली. मशीनमधून रक्कम बाहेर येताना मशीनचा पॉवर स्वीच बंद केला. त्यानंतर पैसे अर्धवट बाहेर आलेले ओढून काढले. त्यानंतर पुन्हा पॉवर स्वीच सुरू करून बँकेच्या ग्राहक केंद्राशी संपर्क साधून आमच्या खात्यावरील रक्कम निघाली नसल्याची तक्रार केली.
बँकेने पुन्हा त्याच खात्यावर रक्कम भरली. अशाप्रकारे सोळावेळा चोरट्यांनी नऊ एटीएम कार्डांवरून पैसे काढून बँकेची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. हरियाणातील खातेदारांचे एटीएम कार्ड या चोरट्यांकडे कसे आले. खातेदाराच चोरटे आहेत काय? या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत.