कोल्हापूर : कॅन्सर रुग्णालय सव्वा कोटींच्या अपहार प्रकरणाची कसून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 18:52 IST2018-06-27T18:51:07+5:302018-06-27T18:52:54+5:30
गोकुळ शिरगांव येथील कोल्हापूर कॅन्सर रुग्णालयातील अकौंट व्यवस्थापकाने औषध खरेदीच्या बोगस बिलाच्या नोंदी करून सुमारे १ कोटी ३१ लाख ९० हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे.

कोल्हापूर : कॅन्सर रुग्णालय सव्वा कोटींच्या अपहार प्रकरणाची कसून चौकशी
कोल्हापूर : गोकुळ शिरगांव येथील कोल्हापूर कॅन्सर रुग्णालयातील अकौंट व्यवस्थापकाने औषध खरेदीच्या बोगस बिलाच्या नोंदी करून सुमारे १ कोटी ३१ लाख ९० हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रुग्णालयास बुधवारी भेट देऊन दिवसभर कसून चौकशी केली. कागदोपत्री भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
गुन्हा दाखल झाल्याचे समजताच संशयित अकौंट व्यवस्थापक अजय आनंदराव खोत (रा. लाईन बाजार, कसबा बावडा), किरण शिंदे (रा. कोडोली, ता. पन्हाळा), प्रवीण दत्तात्रय आळतेकर (रा. माळवाडी, दानोळी, ता. शिरोळ) हे पसार झाले आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक आर. बी. शेडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
डॉ. सूरज भास्करराव पवार (वय ४८, रा. माळी कॉलनी, टाकाळा) यांच्या मालकीचे गोकुळ शिरगांव येथे कोल्हापूर कॅन्सर रुग्णालय आहे. याठिकाणी संशयित अजय खोत हा अकौंट व्यवस्थापक म्हणून काम करत होता. त्याने दि. २ जानेवारी २०१५ ते १ एप्रिल २०१६ या कालावधीत आपल्या पदाचा गैरवापर करत औषध खरेदीच्या बोगस बिलांच्या नोंदी करून संशयित किरण शिंदे व प्रवीण आळतेकर यांच्याशी संगनमत करून औषध पुरवठ्याची खोटी बिले सादर करून सव्वा कोटींचा अपहार केल्याचे उघडकीस आले.
आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांच्यासह चौघांच्या पथकाने रुग्णालयास भेट देऊन येथील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले. संशयितांच्या घराची झडती घेतली असता ते पसार झाल्याचे निदर्शनास आले.
त्यांचे मोबाईलही बंद आहेत. कागदोपत्री चौकशी सुरू असून भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. लवकरच संशयितांना अटक केली जाईल, असे शेडे यांनी सांगितले.