कोल्हापूर :‘त्या’ दोघा सावकारांना अद्याप अटक नाही, व्याजासाठी तगादा लावून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 10:36 AM2018-06-30T10:36:24+5:302018-06-30T10:37:55+5:30
दहा टक्के व्याजाने पैसे देऊन मुद्दलीसह व्याजासाठी तगादा लावून मारहाण करणाऱ्या दोघा खासगी सावकारांवर राजारामपुरी व जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस झाले तरी अद्याप सावकारांना अटक झालेली नाही.
कोल्हापूर : दहा टक्के व्याजाने पैसे देऊन मुद्दलीसह व्याजासाठी तगादा लावून मारहाण करणाऱ्या दोघा खासगी सावकारांवर राजारामपुरी व जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस झाले तरी अद्याप सावकारांना अटक झालेली नाही. संशयित बंटीशेठ पिंजाणी (रा. राजारामपुरी), नरेश अशोक परूळेकर (रा. विश्रामबाग, सांगली) अशी त्यांची नावे आहेत.
फिर्यादी जयंत वसंत नेर्लेकर (वय ६१, रा. बालाजी रेसिडेन्सी, नागाळा पार्क) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी संशयित सावकार बंटीशेठ पिंजाणी याच्याकडून दोन लाख रुपये घेतले. पिंजाणी याला दोन लाखांच्या व्याजापोटी आतापर्यंत सहा टक्के व्याजाने १ लाख ५३ हजार रुपये दिले असतानाही रात्री-अपरात्री, घरात व पाच बंगला शाहूपुरी येथील कार्यालयात येऊन मुद्दल दोन लाखांसह व्याज ७२ हजार रुपये देण्यासाठी तगादा लावून शिवीगाळ करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच सचिन आनंदराव वरूटे (वय ३६, रा. ताराबाई रोड, साकोली कॉर्नर) यांनी घराच्या नूतनीकरणासाठी पैशांची गरज असल्याने सावकार नरेश परूळेकर याचेकडून एक लाख रुपये घेतले होते. या रकमेच्या व्याजापोटी वरुटे यांनी सुमारे ४ लाख ५० हजार रुपये परूळेकरला दिले; मात्र परूळेकर हा वरूटे यांचेकडे आणखी १ लाख ९० हजार रुपयांची मागणी करत आहे. त्यासाठी त्याने तगादा लावून शिवीगाळ केली होती. या दोन्ही सावकारांना अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही.