कोल्हापूर : श्री जोतिबा यात्रेनिमित्त अन्नछत्र, पहिल्या दिवशी हजारो भाविकांनी घेतला लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 06:33 PM2018-03-30T18:33:45+5:302018-03-30T20:03:55+5:30
श्री जोतिबा यात्रेनिमित्त शिवाजी चौक तरुण मंडळ (शिवाजी चौक)तर्फे यात्रेकरूंसाठी मोफत अन्नछत्राचा प्रारंभ माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी झाला. हे अन्नछत्र ३० मार्च ते १ एप्रिलदरम्यान सलगपणे यात्रेकरूंच्या सेवेत सुरू राहणार आहे. यंदा अन्नछत्राचे २४ वे वर्ष आहे.
कोल्हापूर : श्री जोतिबा यात्रेनिमित्त शिवाजी चौक तरुण मंडळ (शिवाजी चौक)तर्फे यात्रेकरूंसाठी मोफत अन्नछत्राचा प्रारंभ माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी झाला. हे अन्नछत्र ३० मार्च ते १ एप्रिलदरम्यान सलगपणे यात्रेकरूंच्या सेवेत सुरू राहणार आहे. यंदा अन्नछत्राचे २४ वे वर्ष आहे.
पंचगंगा नदीघाटावर या अन्नछत्रालयाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस रात्रंदिवस चालणाऱ्या या अन्नछत्रालयात सुमारे एक लाखाहून अधिक भाविक प्रसादाचा लाभ घेणार आहेत. यात मसालेभात, कुर्मापुरी, कांदा भजी, जिलेबी, शिरा, पापड, अशा पंचपक्वान्नांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या प्रसादाचा लाभ सावलीत बसून घेण्याकरिता पंचगंगा नदीघाटावर पाच हजार चौरस फुटांचा मंडप उभारण्यात आला आहे. गणेश सावंत यांनी कॅटरिंग व्यवस्था यांनी केली आहे. याकरिता १०० सहकारी कार्यरत आहेत. पहिल्या दिवशी हजारो भाविकांनी या अन्नछत्राचा लाभ घेतला.
मंडळाचे अध्यक्ष माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्यासह उपाध्यक्ष सुहास भेंडे, चंद्रकांत स्वामी, महंमद पठाण, जगन्नाथ लिधडे यांच्या देखरेखेखाली अडीचशेहून कार्यकर्ते राबत आहेत. गेल्या वर्षी या अन्नछत्राचा लाभ सुमारे सव्वा लाखाहून अधिक भाविकांनी घेतला.
दरम्यान, सौराष्ट्र कडवा पटेल समाजातर्फे रोज या ठिकाणी चार हजारांहून अधिक भाविकांसाठी सकाळी ७ ते १० या वेळेत पोहे, शिरा, उप्पीट, चहा या नाष्ट्याची सोय केली आहे. त्याचाही लाभ अनेकांनी घेतला.
अन्नछत्राच्या उद्घाटनप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, नीलेश पाटील, मनोहर चुघ, अतुल शहा, राजाभाऊ बेंडके, रमेश लालवाणी, मगनलाल ओसवाल, राजेंद्र आलूरकर, एस. के. पाटील, विजय शेटे, राजेंद्र शेटे, सतीश घोरपडे, के. के. खंडवाणी, अॅड. सुभाष हिंदुजा, गोपीशेठ वधवाणी, शशिकांत कोकाटे, सुरेश बेर्डे, जयसिंगराव कदम, आदी उपस्थित होते.
कोल्हापुरात दातृत्व असणारी माणसे भरपूर आहेत. त्यामुळे आमच्या मंडळाने गेली २४ वर्षे जोतिबा यात्रेकरिता येणाऱ्या भाविकांची भोजनाची सोय चांगल्या प्रकारे केली आहे. यापुढेही हे दातृत्व असेच चालू राहिले आहे. मंडळाचे गेली ३८ वर्षांतील सामाजिक व विधायक उपक्रम पाहून अन्नछत्रासाठी समाजातील अनेकांनी हातभार लावला आहे.
- दत्तात्रय लाड,
अध्यक्ष, अन्नछत्र