कोल्हापूर : दहा हजार शेतकऱ्यांची सोमवारी ‘नाबार्ड’वर धडक, अपात्र ११२ कोटी परत देण्यासाठी पुणे कार्यालयासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 06:48 PM2018-01-20T18:48:05+5:302018-01-20T18:53:05+5:30
केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटी परत द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील दहा हजार शेतकरी सोमवारी ‘नाबार्ड’च्या पुणे कार्यालयावर धडक देणार आहेत. शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत, त्यातच या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नसताना पैसे आडवून ठेवणे अन्यायकारक आहे. याचा निषेध करण्यासाठी शेतकरी ‘नाबार्ड’च्या दारात ठिय्या आंदोलन करणार आहेत.
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटी परत द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील दहा हजार शेतकरी सोमवारी ‘नाबार्ड’च्या पुणे कार्यालयावर धडक देणार आहेत. शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत, त्यातच या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नसताना पैसे आडवून ठेवणे अन्यायकारक आहे. याचा निषेध करण्यासाठी शेतकरी ‘नाबार्ड’च्या दारात ठिय्या आंदोलन करणार आहेत.
केंद्र सरकारने दिलेल्या कर्जमाफीची रक्कम ४४ हजार शेतकऱ्यांकडून नाबार्डने परत घेतली आहे. कर्ज मर्यादेच्या निकषाचा आधार घेत नाबार्डने ही रक्कम जिल्हा बॅँकेकडून वसूल केली.
याविरोधात विकास संस्था व काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते; पण नाबार्डने उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आणि स्थगिती मागितली होती.
सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीस नकार दिल्याने उच्च न्यायालयाचा निकाल कायम राहतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तशी मागणी शेतकऱ्यांनी नाबार्डकडे केली होती; पण हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचे नाबार्डने सांगितले.
याविरोधात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील दहा हजार शेतकरी उद्या नाबार्ड, पुणे कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करणार आहेत.
नाबार्ड जोपर्यंत पैसे परत देण्याचे लेखी आश्वासन देणार नाही, तोपर्यंत तेथून हलणार नाही, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जाणीव जागृती करण्यासाठी शिरोळ, राधानगरी, गारगोटी, पन्हाळा, करवीर, कागल, शाहूवाडी येथे शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत.
आंदोलन न करण्याचे आवाहन
अपात्र कर्जमाफीचा विषय न्यायालयात प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये, असे आवाहन नाबार्डने अपात्र कर्जमाफी कृती समितीला केले होते; पण ते त्यांनी धुडकावून लावले आहे.
जिल्ह्यातून किमान एक हजार वाहनांतून दहा हजार शेतकरी नाबार्डच्या दारात ठिय्या मारणार आहेत. पैसे परत देण्याचे लेखी आश्वासन घेतल्याशिवाय तेथून हलणार नाही.
- प्रकाश तिपन्नवार,
सदस्य, कृती समिती