कोल्हापूर : थरारक पाठलाग करून तिघा चोरट्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 05:34 PM2018-08-18T17:34:20+5:302018-08-18T17:36:36+5:30
माळी कॉलनी, टाकाळा येथे शनिवारी पहाटे चारच्या सुमारास थरारक दुचाकीचा पाठलाग करून तिघा सराईत चोरट्यांना राजारामपुरी पोलिसांनी शिताफीने पकडले.
कोल्हापूर : माळी कॉलनी, टाकाळा येथे शनिवारी पहाटे चारच्या सुमारास थरारक दुचाकीचा पाठलाग करून तिघा सराईत चोरट्यांना राजारामपुरी पोलिसांनी शिताफीने पकडले.
ऋतुराज ऊर्फ डेज्या विनायक इनामदार (वय २२, रा. जोशी गल्ली, विक्रमनगर), अमित सर्जेराव देवमाने (२३, रा. मारुती मंदिरजवळ, रुईकर कॉलनी), रविराज महेश कसबेकर (२२, रा. टेंबलाईनाका झोपडपट्टी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून कार, दोन दुचाकी, टीव्ही, कुकर, गॅस टाकी, घड्याळे असा सुमारे चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबतची अधिक माहिती अशी, मानस अपार्टमेंट, माळी कॉलनी, टाकाळा येथील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी गॅस टाकी, घड्याळ, टॅब व रोखतीन हजार रुपये असा सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता.
याप्रकरणी स्वप्निल विजयकुमार महाजन (वय २८) यांनी राजारामपुरी पोलिसांत शुक्रवारी (दि. १७) फिर्याद दिली होती. वाढत्या घरफोडीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार शांतिनाथ हुंडुरके, हवालदार अशोक पाटील, संजय जाधव, निवास पाटील, अमोल अवघडे, गौरव चौगुले असे गुन्हे पथक शनिवारी पहाटे चारच्या सुमारास माळी कॉलनी येथे गस्त घालत असताना नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरून तिघे संशयितरीत्या फिरताना दिसून आले.
पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते भरधाव पळून जाऊ लागले. यावेळी त्यांचा थरारक पाठलाग करून माळी कॉलनी येथील स्विमिंग टँकसमोर त्यांना पकडले. पोलीस ठाण्यात खाकीचा प्रसाद देताच त्यांनी घरफोड्यांची कबुली दिली.
गुन्ह्यात वापरलेली दुचाकी चोरीची असल्याचे सांगितले. अशा सुमारे चार घरफोड्या व दुचाकी चोरीची कबुली त्यांनी दिली. त्यांच्या ताब्यातून कार, दोन दुचाकी, गॅस टाकी, टॅबलेटस, मनगटी घड्याळे, टीव्ही, कुलर, डिव्हीडी प्लेअर, मिक्सर, असा सुमारे चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.