कोल्हापूर :घरात लपविलेला साडेतीन लाखांचा मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 04:44 PM2018-11-14T16:44:05+5:302018-11-14T16:46:54+5:30
कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या शनिवार पेठ येथून घरात लपवलेला साडेतीन लाख किमतीचा विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून सोमवारी (दि. १२) रात्री जप्त केला. याप्रकरणी संशयित प्रसाद अरुण भोसले (वय ४५, रा. सी वॉर्ड, शनिवार पेठ) याला अटक केली.
कोल्हापूर : शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या शनिवार पेठ येथून घरात लपवलेला साडेतीन लाख किमतीचा विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून सोमवारी (दि. १२) रात्री जप्त केला. याप्रकरणी संशयित प्रसाद अरुण भोसले (वय ४५, रा. सी वॉर्ड, शनिवार पेठ) याला अटक केली.
अधिक माहिती अशी, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी आॅटो रिक्षामधून होणारी मद्याची वाहतूक पकडली होती. यावेळी मद्याचे सात बॉक्स जप्त केले होते. हा मद्यसाठा शनिवार पेठ येथील प्रसाद भोसले याच्या घरातून आणल्याची गोपनीय माहिती मिळाली.
त्यानुसार मध्यरात्रीच्या सुमारास भोसलेच्या घरी छापा टाकला असता, घरातील एका कुलूपबंद खोलीमध्ये साडेतीन लाख किमतीचे विदेशी मद्याचे ३९ बॉक्स मिळून आले. संशयित भोसले हा शहरात फोनवरील आॅर्डरीप्रमाणे स्वत: मद्याचा पुरवठा करीत होता. त्याला या व्यवसायामध्ये आणखी कोणी मदत करीत होते काय, याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली.
नागरिकांनी माहिती द्यावी
जिल्ह्याच्या विविध भागांत विदेशी मद्यसाठा, विक्री व वाहतुकीबाबतच्या कारवाया सुरू आहेत. अशा प्रकारे अवैध मद्यसाठ्याबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक गणेश पाटील यांनी केले आहे.