कोल्हापूर : पर्यटक, भाविकांना लुटणाऱ्या तिघांना अटक, तीन लाख किमतीचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 11:09 AM2018-11-06T11:09:58+5:302018-11-06T11:13:28+5:30
पन्हाळा, जोतिबा आणि गगनबावडा रोडवर पर्यटक, भाविकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटमारी करणाऱ्या तिघाजणांच्या टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आवळल्या. त्यांच्या ताब्यातून एक दुचाकी, सोन्याचे दागिने, १३ मोबाईल, दोन शस्त्रे असा सुमारे तीन लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
कोल्हापूर : पन्हाळा, जोतिबा आणि गगनबावडा रोडवर पर्यटक, भाविकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटमारी करणाऱ्या तिघाजणांच्या टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आवळल्या. त्यांच्या ताब्यातून एक दुचाकी, सोन्याचे दागिने, १३ मोबाईल, दोन शस्त्रे असा सुमारे तीन लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला. लुटारुंनी चार लुटमारी आणि एका चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संशयित योगेश ऊर्फ गोपी राजेश गागडे (वय २२, रा. कंजारभाट वसाहत, शिंगणापूर, ता. करवीर), रियाज नबी तांबोळी (१९, रा. गणेशनगर, शिंगणापूर), सोहेल उर्फ जॉन्टी राजू मांगलेकर (२२, रा. संकपाळ नगर, कसबा बावडा) अशी त्यांची नावे आहेत.
संशयित आरोपी पन्हाळा, जोतिबा, गगनबावडा रोडवर पहाटे व रात्रीच्या दरम्यान दुचाकीवरून ये-जा करणाऱ्या पर्यटक, भाविकांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील दागिने, मोबाईल आणि रोकड जबरदस्तीने काढून घेत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
दसरा सणाच्यावेळी बाळासाहेब ज्ञानदेव श्ािंदे हे पत्नीसह दुचाकीवरून पहाटे जोतिबाला देवदर्शनासाठी जात असताना त्यांना कोयत्याचा धाक दाखवून लुटमारी केली होती. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी बाळासाहेब शिंदे यांच्या पत्नीकडे चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा करीत असताना समोरून रोडने आलेल्या दुसऱ्या गाडीची लाईट दिसल्यावर आरोपींनी पळून जाताना ऐकमेकाला गोप्या, गोट्या तसेच जॉन्ट्या या नावाने हाक देऊन पळून गेल्याची माहिती दिली. त्यानुसार चौकशीमध्ये भरदिवसा शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये १६ लाखांची लुटमार करणारा सराईत गुन्हेगार योगेश ऊर्फ गागडे याने आणखी दोन साथीदारांच्या मदतीने लुटमारी केल्याची माहिती मिळाली.
संशयित गोपी गागडे हा रविवारी आपल्या दोन साथीदारांना दुचाकीवरून शिंगणापूर येथील म्हसोबा मंदिर परिसरात आल्याचे समजताच पथकाने त्यांना पकडले. त्यांच्या प्रत्येकाच्या खिशामध्ये दोन मोबाईल मिळून आले. दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. सोहेल मांगलेकर हा प्रथमेश माने या नावाने फिरत होता.
या तिघांनी चार लुटमारी आणि एक चोरी अशा पाच गुन्ह्यांची कबुली दिली. गोपी गागडे हा सेट्रिंगचे काम करीत असून, सराईत आहे. तो दोनवेळा कारागृहाची हवा खाऊन आला आहे. त्याच्या वेगवेगळ्या टोळ्या आहेत. रियाज तांबोळी हा महाविद्यालयीन शिक्षण घेतो. सोहेल मांगलेकर हा वाहनावर चालकाचे काम करतो. चोरीच्या दुचाकीवरून ते पहाटे आणि रात्रीचे लुटमारी करीत फिरत. तिघांनाही चैनी करणे, दारू पिण्याची सवय आहे.
उघडकीस आलेल्या गुन्ह्यांतील फिर्यादीची नावे
कृष्णा दिनकर म्हेतर (३९, रा. खोकुर्ले पैकी पडवळवाडी (ता. करवीर), विजय तुकाराम कांबळे (२४, रा. सातार्डे, ता. पन्हाळा), बाळासाहेब ज्ञानदेव शिंदे (५१, रा. जवाहरनगर, कोल्हापूर), श्रीकांत महादेव पाटील (३८, रा. कळंबे तर्फ कळे, ता. करवीर), रमेश श्रीशैल वाघमारे (रा. शाकांबरी कॉलनी, शिंगणापूर, ता. करवीर)