कोल्हापूर : बार असोसिएशनमध्ये तीन पॅनेल शक्य, अर्जांनंतर प्रचाराला गती ; १५ ला मतदान, निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:03 PM2018-06-06T12:03:10+5:302018-06-06T12:03:10+5:30
वकीलबांधवांची जिल्ह्यातील शिखरसंस्था असलेल्या कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीमध्ये तीन पॅनेल होण्याची शक्यता आहे. बार असोसिएशनची निवडणूक तीन माजी अध्यक्ष तीन पॅनेल करून लढवण्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे सोमवार (दि. ११) व मंगळवारी (दि. १२) अर्ज भरल्यानंतर प्रचाराला खऱ्या अर्थाने गती येणार आहे.
कोल्हापूर : वकीलबांधवांची जिल्ह्यातील शिखरसंस्था असलेल्या कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीमध्ये तीन पॅनेल होण्याची शक्यता आहे. बार असोसिएशनची निवडणूक तीन माजी अध्यक्ष तीन पॅनेल करून लढवण्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे सोमवार (दि. ११) व मंगळवारी (दि. १२) अर्ज भरल्यानंतर प्रचाराला खऱ्या अर्थाने गती येणार आहे.
सध्या सभासद नोंदणी सुरू आहे. मंगळवारअखेर सुमारे ११०० सभासद झाले होते. मतदार सभासद नोंदणीचा आज, बुधवार अंतिम दिवस आहे. यासाठी १५ ला सकाळी मतदान तर सायंकाळी सहानंतर मतमोजणी होणार आहे. याच दिवशी रात्री निकाल लागणार आहे.
जिल्हा बार असोसिएशनची दरवर्षी जूनमध्ये निवडणूक होते. गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकीत तीन पॅनेल झाली होती. यंदाही तीन पॅनेल होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात सुमारे तीन हजार वकील आहेत. सभासदालाच या निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे.
उन्हाळी सुटीनंतर गेले दोन दिवस वकील बांधवांची रेलचेल सुरू आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीतील तीनही पॅनेल संभाव्य उमेदवार सध्या चाचपणी करत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निवडणुकीची सूत्रे माजी अध्यक्षांच्या हाती आहेत.
रविवारी (दि. १०) कच्ची मतदार यादी प्रसिद्ध व त्यावरील हरकती तर सोमवार (दि. ११) दुपारी ४ वा.पक्की मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. ही निवडणूक अध्यक्षपदासह उपाध्यक्ष, सेक्रेटरी आदी १५ जागांसाठी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर वकिलांच्या वैयक्तिक व तालुकास्तरावरील गाठी-भेटींना वेग येणार आहे.
त्याचबरोबर तिन्ही माजी अध्यक्ष प्रचारासाठी कमी कालावधी मिळणार असल्याने ते आपले पॅनेल निवडून येण्यासाठी ताकद पणाला लावणार हे निश्चित. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. सुभाष पिसाळ हे काम पाहत आहेत.