कोल्हापूर : सायरन वाजताच चोरट्यांचे पलायन, भरदिवसा बँक फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 02:24 PM2018-08-01T14:24:46+5:302018-08-01T14:32:32+5:30
गणेशवाडी (ता. करवीर) येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेचे शर्टर भरदिवसा उचकटून आतमध्ये प्रवेश करताच सायरन वाजल्याने चोरट्यांनी पलायन केले. ही घटना घडून नऊ दिवस झाल्यानंतर सोमवारी (दि. ३०) करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे औदार्य दाखविले आहे.
कोल्हापूर : गणेशवाडी (ता. करवीर) येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेचे शर्टर भरदिवसा उचकटून आतमध्ये प्रवेश करताच सायरन वाजल्याने चोरट्यांनी पलायन केले. ही घटना घडून नऊ दिवस झाल्यानंतर सोमवारी (दि. ३०) करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे औदार्य दाखविले आहे. बँक फोडण्याचा प्रयत्न होऊनही पोलिसांकडून अक्षम्य दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर नागरिकांत भीती पसरली आहे.
अधिक माहिती अशी, गणेशवाडी येथील प्रताप चंद्रकांत पाटील यांच्या गाळ्यामध्ये गेल्या पाच वर्षांपासून एका राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आहे. शाखाधिकारी सुरेश अशोक देसाई (वय ४४, रा. मिणचे सावर्डे, ता. हातकणंगले) हे शनिवारी, २१ जुलैला चार वाजता बँक बंद करून घरी गेले.
दुसऱ्या दिवशी रविवारी २२ जुलैला दुपारी दोनच्या सुमारास अचानक बँकेचा सायरन वाजला. तो एकसारखा वाजू लागल्याने शेजारील लोकांनी बँकेचा शिपाई एकनाथ माने (रा. गणेशवाडी) यांना फोनवरून माहिती दिली. माने तत्काळ बँकेत आले असता बँकेचे शटर उचकटलेले होते. आतमध्ये लोखंडी पहार पडली होती.
चोरीचा संशय आल्याने त्यांनी व्यवस्थापक सुरेश देसाई यांना बोलावून घेतले. देसाई यांनी बँकेत येऊन पाहणी केली असता बँकेच्या मागील बाजूच्या खिडकीचे गज वाकविलेले दिसले. तेथून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न असफल झाल्यानंतर चोरट्यांनी शटर उचकटून आत जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र बँक बंद असताना शटर उघडल्यानंतर आतमध्ये कोणीही गेले असता सायरन वाजतो. नेमका त्याच वेळी सायरन वाजल्याने चोरट्यांनी लोखंडी पहार जागेवर टाकून पोबारा केला. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यामध्ये चोरटे दिसून येत नाहीत.
नऊ दिवसांनी फिर्याद
चोरीच्या प्रकारानंतर बँकेचे व्यवस्थापक सुरेश देसाई, गणेशवाडी, सावरवाडी आणि बीडशेड येथील पोलीस पाटलांनी करवीर पोलीस ठाणे गाठले. त्यांनी ठाणे अंमलदारांना घटनेची माहिती दिली. त्यांनी सर्व पोलीस नंदवाळ येथील आषाढी एकादशी यात्रेला बंदोबस्तासाठी गेले आहेत. त्यामुळे तिकडे येण्यासाठी कोणी उपलब्ध नाही. तुम्हाला आम्ही फोन केल्यानंतर या, असे सांगून त्यांना परत पाठविले. त्यानंतर तब्बल नऊ दिवसांनी चोरीची फिर्याद दाखल करून घेतली.
बावीस लाखांची रोकड
बँकेतील तिजोरीत सुमारे २२ लाखांची रोकड होती. त्याचा सुगावा चोरट्यांना लागळा असण्याची शक्यता आहे. भरदिवसा बँक फोडण्याचा प्रयत्न झाला असताना सायरन वाजल्याने चोरटे लोखंडी पहार जागेवर टाकून पळून गेले. ते आसपासच्या परिसरातीलच असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यानुसार त्यांचा शोध सुरू आहे.