कोल्हापूर टोलमुक्त करावे : उद्धव ठाकरे

By admin | Published: November 3, 2014 12:49 AM2014-11-03T00:49:47+5:302014-11-03T01:02:02+5:30

नव्या सरकारकडून अपेक्षा : महाराष्ट्राचे भले व्हावे

Kolhapur toll free: Uddhav Thackeray | कोल्हापूर टोलमुक्त करावे : उद्धव ठाकरे

कोल्हापूर टोलमुक्त करावे : उद्धव ठाकरे

Next

कोल्हापूर : ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ हे शिवसेनेचे ध्येय आहे. नवे सरकार टोलबाबत धोरण निश्चित करीलच; पण राज्यात टोलविरोधातील आंदोलनाची सुरुवात कोल्हापूरमधून झाली. त्यामुळे नव्या सरकारने कोल्हापूरला टोलमुक्त करावे. सत्तेचे राजकारण बदलत असून अशा स्थितीत महाराष्ट्राचे भले व्हावे, अशी राजकीय अपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज, रविवारी येथे व्यक्त केली.
विधानसभेत शिवसेनेला मिळालेल्या यशानंतर करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी ते आज कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, विधानसभेच्या निकालानंतर आज पहिल्यांदाच मी मुंबईबाहेर पडलो आहे. लोकसभेत कोल्हापूरमध्ये झालेल्या पराभवाची खंत वाटत होती. त्यामुळे विधानसभेसाठीची तयारी अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन केली. तिने भरभरून आशीर्वाद दिल्याने चांगले यश मिळाले. कोल्हापुरात शिवसेनेचे चांगले वातावरण व उत्साह आहे. शिवसेनेला भरभरून यश दिल्याबद्दल मी कोल्हापूरकरांचा ऋणी आहे. सत्तेच्या राजकारणात काहीही झाले तरी कोल्हापूर टोलमुक्त करणे, तीर्थक्षेत्र आराखडा, ऊसदराचा प्रश्न सोडविण्यासाठी मी वचनबद्ध आहे. विधानसभेतील लढाई विषम होती. कोणाशी, कसे लढलो हे सर्वांनाच माहीत आहे. या लढाईत कट्टर शिवसैनिक व सर्वसामान्यांचा शिवसेनेच्या माध्यमातून विजय झाला आहे. टोलमुक्त महाराष्ट्र, ऊसदर, कांद्याचा हमीभाव अशा प्रश्नांना उत्तर देणारे नवे सरकार असून त्याला माझ्या शुभेच्छा आहेत. निवडणुकीपूर्वी टोलमुक्त राज्य करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने निकालानंतर टोलबाबत भूमिका बदलली. त्याबाबत ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘टोलमुक्त’चे शिवसेनेचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जातील. नवे सरकार टोलबाबत धोरण निश्चित करीलच; पण सर्वप्रथम राज्यात टोलविरोधातील आंदोलनाची सुरुवात झालेल्या कोल्हापूरला टोलमुक्त करावे, अशी नव्या सरकारकडे आग्रही मागणी आहे. सत्तेचे राजकारण बदलत आहे. अशा स्थितीत महाराष्ट्राचे भले व्हावे अशी माझी राजकीय अपेक्षा आहे.
पत्रकार परिषदेस रश्मी ठाकरे, मिलिंद नार्वेकर, आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, प्रकाश आबिटकर, विजय शिवतारे, विट्याचे आमदार अनिल बाबर, पाटणचे आमदार शंभुराजे देसाई, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, जिल्हा उपसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

सेनेची भूमिका दोन दिवसांत
नुकताच नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला आहे. जरा घाई करू नका, असे सांगत भाजपसमवेत राज्यातील सत्तेबाबतची शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यास ठाकरे यांनी नकार दिला. दोनच दिवसांत याबाबत शिवसेनेची भूमिका सर्वांसमोर जाहीर केली जाईल,असे त्यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur toll free: Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.