‘कोल्हापूर टोल’ आंदोलन राजकीय वळणावर
By admin | Published: September 19, 2014 12:28 AM2014-09-19T00:28:26+5:302014-09-19T00:29:04+5:30
कार्यकर्त्यांत संभ्रम : निमंत्रकच भाजपच्या वाटेवर
कोल्हापूर : शहरात गेली साडेतीन वर्षे सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीतर्फे टोलविरोधी आंदोलन नेटाने सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी ‘दक्षिण’मधून लढण्याची घोषणा केली. यामुळे समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. रस्त्यावरील आंदोलनाबरोबरच निवडणूक रिंगणात उतरून हव्या त्या पक्षाला निवडून आणून टोल हद्दपार करणे हा आंदोलनाचाच एक भाग असल्याचा खुलासा निवास साळोखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शहरातील टोलप्रश्नी तोडगा निघण्याची आशा होती. मात्र, नवीन सरकारवर टोलचा प्रश्न सोपवून राज्यकर्त्यांनी मुद्द्याला बगल दिल्याची भावना कृती समितीच्या कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यामुळे निवडणुकीपर्यंत सलग आंदोलनचा एल्गार कृती समितीने पुकारला आहे. दरम्यान, यापूर्वीच ‘दक्षिण’ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केलेल्या कृती समितीचे निमंत्रक साळोखे यांनी आज, गुरुवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली.
कोणत्याही पक्षाचे लेबल नसल्यानेच निवास साळोखे यांची निमंत्रकपदी नेमणूक केली होती. आता आंदोलनास पक्षीय रंग येण्याची कुजबुज कार्यकर्त्यांतून व्यक्त होऊ लागली. याबाबत खुलासा करताना साळोखे म्हणाले, मला व्यक्तिस्वातंत्र आहे. कृती समितीमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी आहेत. टोलविरोधात रस्त्यावरील आंदोलनास यश आले नाही. आता आगामी निवडणुकीत टोलबाबत फसविणाऱ्यांना धडा शिकविण्याची संधी आहे. शहरवासीयांना फसविणाऱ्यांना घरात बसविण्यासाठीच मी रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. कृती समितीचा माझ्या निवडणुकीशी काहीही संबंध नाही. (प्रतिनिधी)