कोल्हापूर टोलप्रश्नी मंगळवारी चर्चा
By admin | Published: November 13, 2015 11:21 PM2015-11-13T23:21:39+5:302015-11-14T00:20:55+5:30
मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
कोल्हापूर : कोल्हापूर टोलप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबररस्त्यांच्या मूल्यांकनाबाबत मंगळवारी (दि. १७) चर्चा करू व या चर्चेतून निश्चितच मार्ग काढू आणि महिन्याअखेर कोल्हापूर टोलमुक्त करू, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी (दि. १२) कोल्हापुरात दिले.
कोल्हापूर टोलप्रश्नी ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचे नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील, निमंत्रक निवास साळोखे, आदींच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत टोलचे पैसे कसे भागवायचे याविषयी चर्चा झाली. दरम्यान, टोलविरोधी कृती समितीने यापूर्वी पुकारलेले सोमवार (दि. १६)चे शिरोली टोलनाक्यावरील आंदोलन होणार असल्याचे समितीने यावेळी स्पष्ट केले.
चंद्रकांतदादा पाटील यांनी, मी महापालिकेच्या निवडणुकीत व्यस्त होतो. मध्यंतरी माझी दिल्लीत केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर देशातील टोलप्रश्नाबाबत चर्चा झाली. या बंद केलेल्या टोलनाक्यांची रक्कम २३ हजार कोटी रुपये होते. त्यावर मी कोल्हापुरातील टोलप्रश्नासंदर्भात निर्णय घ्यावा, असे गडकरींना सांगितले. गडकरींनी यापूर्वी महाराष्ट्रातील बंद केलेल्या ६५ टोलनाक्यांची रक्कम सुमारे ९६२ कोटी रुपये होते व एलबीटी माफची रक्कम २७०० कोटी होते.
ही सर्व रक्कम ३१ मार्च २०१६ पर्यंत भागविली जाण्याचे नियोजन असल्याचे मला सांगितले, असे बैठकीत पाटील यांनी सांगून कोल्हापुरातील रस्त्यांसंदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या फेरमूल्यांकन समितीतील सदस्य आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांनी सुमारे १९२ कोटी रुपये रक्कम असल्याचा कोल्हापुरातील रस्त्यांचा मूल्यांकन अहवाल शासनाला सादर केला आहे. पण, आय. आर. बी. कंपनीने २७३ कोटी रुपये मूल्यांकन होते आहे, असे सांगितले आहे. यामध्ये सुमारे ८० कोटींचा फरक आहे, तो कसा भरून काढावा, यावर तुम्ही सूचना कराव्यात असे विचारले. त्यावर सर्वांनी राज्य सरकार, महापालिका यांनी आय. आर. बी. कंपनीने पैसे कसे भागवायचे ते तुम्ही ठरवावे, जनतेवर कोणताही आर्थिक बोजा लादू नये, असे सांगितले.
त्यानंतर प्रा. एन. डी. पाटील यांनी, टेंबलाईवाडी येथील महापालिकेची जागा आय. आर. बी.ला दिली व आय. आर. बी.नेही जागा त्यांचीच उपकंपनी असलेल्या आर्यन हॉस्पिटॅलिटीला ९९ वर्षांच्या भाडेकराराने ती दिली आहे. त्यामुळे या जागेची किंमत सुमारे १५ कोटी रुपये असल्याचे आय.आर.बी. सांगत आहे.