राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानात कोल्हापूर टॉप टेनमध्ये, चंदगड आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 03:56 PM2020-07-03T15:56:15+5:302020-07-03T16:02:07+5:30
राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्ष स्थापना वर्धापनदिनाचे औचित्य साधून सुरू केलेल्या अभिप्राय अभियानात कोल्हापूरने राज्यात पहिल्या १० जिल्ह्यांमध्ये येण्याचा मान मिळवला आहे.
कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्ष स्थापना वर्धापनदिनाचे औचित्य साधून सुरू केलेल्या अभिप्राय अभियानात कोल्हापूरने राज्यात पहिल्या १० जिल्ह्यांमध्ये येण्याचा मान मिळवला आहे. १० ते ३० जून या २० दिवसांच्या काळात जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांतून २९ हजार जणांनी अभिप्राय नोंदवले असून, यात चंदगड प्रथम क्रमांकावर आहे. सर्वांत कमी नोंदणी इचलकरंजीत झाली आहे.
गेल्या २ महिन्यांपासून @NCPspeaks पक्षाचे कार्यकर्ते कोरोनाच्या संकटकाळात तळागाळातील लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचे काम करत आहे. लोकांपर्यंत मदत पोहोचवताना कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी, प्रश्न, मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न 'राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय' अभियानांतर्गत केला जाणार आहे. pic.twitter.com/ZF8Crx47t2
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) May 21, 2020
यंदा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पक्षाचा वर्धापनदिन मोठ्या प्रमाणावर साजरा करता येत नसल्याने डिजिटल माध्यमातून कार्यकर्त्यांशी जोडून राहण्यासाठी म्हणून राष्ट्रवादीने १० जून ते ३० जून या कालावधीत अभिप्राय अभियान राबवले. यात राज्यातील सात लाख ६१ हजारांनी सहभाग नोंदवला. ऑनलाईन स्वरूपातच कार्यकर्त्यांकडून माहिती भरून घेण्यात आली. यात पक्षवाढीच्या अनुषंगाने सूचना, प्रलंबित विकासकामे, तळागाळातील कार्यकर्त्यांच्या नेते, पदाधिकाऱ्यांकडून असलेल्या अपेक्षा अशा २४ प्रश्नांची विचारणा करण्यात आली होती.
या अभियानाची सांगता मंगळवारी (दि. ३० जून) झाली. यानंतर आलेले अभिप्राय जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम १० जिल्ह्यांत आला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते पदाधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हे अभिप्राय यशस्वी केले गेले.
तालुका नोंदवलेले अभिप्राय
- चंदगड : ६५६३
- राधानगरी : ४७१७
- शिरोळ : ४३८८
- शाहूवाडी : ३३७९
- कोल्हापूर उत्तर : २१०५
- कागल : १७२०
- कोल्हापूर दक्षिण : १७०९
- हातकणंगले : १४१५
- करवीर : १३६०
- इचलकरंजी : १०७४
एका तालुक्याऐवजी प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघनिहाय मते जाणून घेण्यात आली आहेत; त्यामुळे याला सर्वसमावेशकता आली आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच कोल्हापूर टॉप टेनमध्ये आले आहे.
- अनिल साळोखे,
कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस