कोल्हापूर जिल्हा विभागात अव्वल
By admin | Published: June 3, 2014 01:07 AM2014-06-03T01:07:14+5:302014-06-03T01:25:22+5:30
बारावीचा निकाल : तिसर्या वर्षी मुलींची सरशी
कोल्हापूर : करिअरची दिशा ठरविणार्या बारावीचा निकाल आज, सोमवारी आॅनलाईन जाहीर झाला. कोल्हापूर विभागाचा यावर्षीचा निकाल ९१.५४ टक्के लागला. यात ९२.२० टक्क्यांसह कोल्हापूर जिल्हा अव्वल ठरला. सातारा जिल्ह्याने ९१.२६ टक्क्यांसह दुसरा क्रमांक मिळविला, तर गेल्या वर्षी विभागात प्रथम असलेल्या सांगली जिल्ह्याची घसरण होऊन ९०.९१ टक्क्यांसह तिसर्या क्रमांकावर राहिला. गेल्या वर्षी कोल्हापूर विभागाचा निकाल ८४.१४ टक्के होता. त्या तुलनेत यंदा ७.४० टक्क्यांनी निकाल वाढला आहे. आज दुपारी एक वाजता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष भीमराव कांबळे आणि सचिव शरद गोसावी यांनी येथे पत्रकार परिषदेत विभागाचा निकाल जाहीर केला. कोल्हापूर विभागातून ५८३ कनिष्ठ महाविद्यालयांतील १ लाख १४ हजार ६०३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ४ हजार ९०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेसाठी एकूण ६३ हजार ८३५ मुले, तर ५० हजार ७६८ मुली बसल्या होत्या. मुलांची उत्तीर्णतेची संख्या ५६ हजार ५० असून, त्यांचे प्रमाण ८७.८० टक्के इतके आहे, तर मुलींच्या उत्तीर्णतेची संख्या ४८ हजार ८५६ असून, त्यांचे प्रमाण ९६.२३ टक्के इतके आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेने ८.४३ टक्के इतके अधिक आहे. सलग तिसर्या वर्षी मुलींची उत्तीर्णतेत सरशी राहिली आहे. तीन वर्षांनी ‘कोल्हापूर’ला ‘अच्छे दिन’... कोल्हापूर विभागामध्ये गेल्या वर्षांत निकालामध्ये सांगली जिल्हा पहिल्या क्रमांकावर राहिला. तसेच कोल्हापूर जिल्हा तिसर्या आणि दुसर्या स्थानी होता. यात २०१०-११ मध्ये कोल्हापूर ८०.०७ टक्के, २०११-१२ मध्ये ८१.०९ टक्क्यांसह तिसर्या, तर २०१२-१३ मध्ये ८४.५८ टक्क्यांसह दुसर्या क्रमांकावर होता. यावर्षी मात्र ९२.२० टक्क्यांच्या जोरावर कोल्हापूर जिल्ह्याने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. तीन वर्षांनंतर बारावीच्या निकालात कोल्हापूरला ‘अच्छे दिन आ गये...!’ छायाप्रतीसाठी हे करा... विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २१ जूनपर्यंत अर्ज करता येईल. यासाठी प्रति विषय ४०० रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी पहिल्यांदा उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकन करता येईल.