कोल्हापूर : नातीवर अत्याचार, आजोबाला जन्मठेप, जिल्हा न्यायालयाचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 01:03 PM2018-10-27T13:03:36+5:302018-10-27T13:04:35+5:30
कोल्हापूर : कनाननगर येथे घरात कोणी नसल्याचे पाहून ११ वर्षांच्या नातीवर अत्याचार केल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने जिल्हा व ...
कोल्हापूर : कनाननगर येथे घरात कोणी नसल्याचे पाहून ११ वर्षांच्या नातीवर अत्याचार केल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. के. जाधव यांनी नराधम आजोबाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपी गणपती भाऊ आदमाने (वय ६५, रा. रांगोळी, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, पीडित मुलगी आई-वडील व लहान भाऊ यांच्यासमवेत कनाननगर येथे राहते. वडील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात गजरे, फुले; तर आई भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करते. दरम्यान, रांगोळी येथे राहणारा आजोबा गणपती आदमाने हा १५ सप्टेंबर २०१६ रोजी गणेशोत्सव काळात कनाननगर येथे राहण्यास आला होता. १९ सप्टेंबरला आई-वडील व्यवसायानिमित्त बाहेर गेले होते. मुलगी व आजोबा असे दोघेच घरी होते. यावेळी दुपारी ती झोपलेली पाहून आजोबाने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मुलीला घरी कोणाला सांगितलेस तर ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे भीतीने मुलीने घडलेला प्रकार सांगितला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही तिच्यावर अत्याचार केला. रात्री आई-वडील घरी आल्यानंतर मुलगी रडत असल्याचे दिसून आले. त्यांनी तिच्याकडे विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या जीविताला धोका असल्याने अखेर मुलीच्या आईने सासºयाच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित नराधम आदमाने याला रांगोळी येथील घरातून अटक केली. या प्रकरणी तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक तृप्ती देशमुख यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासले. पीडित मुलीची आई आणि अन्य साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारी वकील विक्रम बन्ने यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी आदमाने याला लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ५ व ६ अन्वये जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
--------------------