कोल्हापूर पर्यटन, संवर्धनाचा मास्टर प्लॅन करणार :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:22 AM2021-02-15T04:22:27+5:302021-02-15T04:22:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्याचा सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा मोठा आहे. परंतु तो संवर्धन करून पर्यटन वृध्दीसाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्याचा सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा मोठा आहे. परंतु तो संवर्धन करून पर्यटन वृध्दीसाठी त्याचा नियोजनबध्द उपयोग करून घेतला गेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र आता या सर्व प्रक्रियेची एकच दिशा राहावी, यासाठी जिल्ह्याच्या ऐतिहासिक संवर्धनाचा आणि पर्यटन वृध्दीचा मास्टर प्लॅन करणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
संभाजीराजे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दुर्ग परिषदेचे आयोजन केले होते. सध्या संभाजीराजे हे रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष असून त्यांच्या नेतृत्वाखाली तेथे उत्खननापासून ते संवर्धनापर्यंत कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी रविवारी लिहिलेल्या ‘जागर’ या सदरामध्ये संभाजीराजे यांनी जिल्ह्याच्या ऐतिहासिक संवर्धन आणि पर्यटन वृध्दीची जबाबदारी घ्यावी, असे सूचित केले होते. याचसंदर्भाने संभाजीराजे यांनी आपली भूमिका मांडली.
ते म्हणाले, गेल्या काही वर्षात माझे पूर्ण लक्ष हे रायगडावर केंद्रित होते. तेथे चांगल्या पध्दतीने काम सुरू आहे. मात्र ती जबाबदारी आहे म्हणून मी माझ्या जिल्ह्यातील जबाबदारी टाळू शकत नाही. त्यामुळेच आता यापुढच्या काळात कोल्हापूर जिल्ह्याच्या ऐतिहासिक संवर्धनाचा आणि पर्यटन वृध्दीचा मास्टर प्लॅन तयार करणार आहे. यासाठी देशभरातील तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल.
यानंतर स्थानिक पातळीवर या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे अनेक मान्यवर आहेत. अनेक तज्ज्ञ व्यक्ती आहेत. त्यांची एक अराजकीय समिती तयार केली जाईल. त्यांच्याशी चर्चा करून हा मास्टर प्लॅन अमलात कसा आणायचा, याची दिशा ठरवली जाईल आणि त्यानंतर मग सर्व सन्माननीय मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने त्याची अंमलबजावणी केली जाईल.
कोट
‘लोकमत’ने मांडलेल्या भूमिकेमुळे कोल्हापूरच्या पर्यटन वृध्दीच्या आणि ऐतिहासिक संवर्धनाच्या माझ्या भूमिकेला बळ मिळाले आहे. याआधीही विशाळगडापासून ते रांगण्यापर्यंतच्या किल्ल्यांना निधीसाठी मी प्रयत्न केला. परंतु रांगणा येथे तर अपेक्षेप्रमाणे काम झाले नाही. आता विकासाचा मास्टर प्लॅन करूनच मग अंमलबजावणी केली जाईल.
- खासदार संभाजीराजे छत्रपती