नेत्यांना व्हीजन नसल्याने कोल्हापूरचे पर्यटन अडखळले, रोजगाराच्या अनेक संधी
By इंदुमती सूर्यवंशी | Published: April 20, 2024 05:47 PM2024-04-20T17:47:43+5:302024-04-20T17:48:22+5:30
क्षमतांचा पुरेपूर उपयोग करण्यात मागे
इंदुमती गणेश
कोल्हापूर : देशातील ५१ शक्तिपीठांतील देवता असलेली अंबाबाई, जोतिबा, खिद्रापूर, नृसिंहवाडीसह धार्मिक अधिष्ठान लाभलेला जिल्हा, विशाळगड, पावनखिंड, पन्हाळासारखे गडकिल्ले, आंबा, आंबोलीसारखे घाट, शेती व पूरक व्यवसायातून ॲग्रो टुरिझम, संस्थान विकासाचे रोल मॉडेल तयार केलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापुरात पर्यटनाचा भरभरून वारसा असताना त्याचा डंका वाजवण्यात येथील राजकीय नेतृत्व अपयशी ठरले आहे.
पर्यटनासाठी उपयुक्त सर्व क्षमता असताना केवळ नेत्यांमध्ये या क्षेत्राचा विकास व उत्पन्नवाढीसाठी उपयोग करून घेण्याच्या दूरदृष्टीचा अभाव आहे. त्यामुळेच केंद्र-राज्य शासनाच्या योजना, निधीद्वारे या स्थळाचा ठोस विकास नेत्यांनी न केल्याने पर्यटनाच्या नकाशावर कोल्हापूरची पाटी काेरीच राहिली आहे. त्यामुळेच कोल्हापूर म्हटलं की फक्त तांबडा-पांढरा रस्सा एवढेच चित्र समोर येते, अजून दहा चांगल्या गोष्टी जगाला सांगण्यात आम्ही मागे राहिलो आहे.
कोल्हापूरला निसर्गाने भरभरून दान दिले आहे, हिमालय आणि समुद्र आणि वाळवंट साेडला, तर जिल्ह्यात सगळे आहे. गडकिल्ले, धार्मिक अधिष्ठान. राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेले धरण, क्रीडा, कला, साहित्य, संस्कृती, चित्रपटसृष्टीचा वारसा. रंकाळा हे तर कोल्हापूरची वैशिष्ट्ये; पण जिल्ह्यामध्येही प्रकाशात न आलेली किंवा आलेली अनेक पर्यटन, ऐतिहासिक वारसा स्थळे आहे. मेट्रो सिटीमधील पर्यटकांना आकर्षित करणारे कृषी व कृषी पर्यटन, पावसाळी पर्यटन, उद्योजकीय दृष्टीने मधाचे गाव पाटगावसारखी अनेक गावे त्यांच्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहेत. त्यांचा विकास, सोयीसुविधा निर्माण करून त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार देण्याची व पर्यटनाला उद्योगामध्ये रूपांतरित करण्याची दूरदृष्टी आजवर एकाही खासदाराला लाभली नाही. केंद्राकडून जिल्ह्यातील पर्यटन स्थळासाठी भरभरून निधी आणला आहे, त्यातून त्याचा विकास होऊन ते रोल मॉडेल ठरले आहे, असे एकही ठोस काम आतापर्यंतच्या नेत्यांनी केले नाही.
शेतीनंतरचे पर्यटन हा कोल्हापूरचा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग आहे; पण त्याकडे आजवर दुर्लक्षच झाले आहे. शहर वगळता जिल्ह्यातील खिद्रापूरसारखी ठिकाणे लोकांना शोधत जावी लागतात. पर्यटन उद्योग वाढवायचा असेल तर अशा ठिकाणी जाण्यासाठी दळणवळणासाठी चांगले रस्ते, वाहतूक व सोयीसुविधा, स्थानिकांचा रोजगार वाढवणारे लघु उद्योग तेथे निर्माण करणे गरजेचे आहे. - महेश जानवेकर, पर्यटन अभ्यासक
जिल्ह्याचा स्वतंत्र पर्यटन विकास आराखडा तयार झाला पाहिजे. शासनाचा निधी आणि स्थानिकांच्या सहभागातून पाच वर्षांत जिल्ह्यातील किमान ५ पर्यटन स्थळे पूर्णत: विकसित करायची आणि तेथे पर्यटन उद्योग सुरू झाला पाहिजे असे टार्गेट ठेवून काम केले पाहिजे. पर्यटकांना रस्ते, सोयीसुविधा, निवासस्थाने, माहिती व मार्गदर्शन केंद्र एवढ्या गोष्टी देणे गरजेचे आहे. - आदित्य बेडेकर, उद्योजक, पर्यटन विशेषज्ञ
पर्यटन स्थळांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ब्रँड प्रमोशन केले पाहिजे. नैसर्गिक पर्यटनस्थळे आणि विकसित केलेल्या पर्यटन स्थळांसह पर्यटनाच्या १० पैकी ७ ते आठ निकषात आपण बसतो. अन्य देशांतील राजदूतांपासून ते राज्यातील सेलिब्रिटी, प्रमुख अधिकारी, पर्यटन मंत्री व पर्यटन उद्योगातील कंपन्या, संस्था यांच्यापर्यंत कोल्हापूरची माहिती पोहोचवली पाहिजे. त्यासाठी राजकीय नेत्यांनी केंद्र-राज्य शासन पातळीवर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी, निधीसाठी आणि पर्यटनाच्या योजना आणण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न व्हावेत. - वसीम सरकावस, पर्यटन सल्लागार