कोल्हापूर : बसच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून ऊसतोड महिला मजूर ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 05:56 PM2018-10-27T17:56:13+5:302018-10-27T17:57:37+5:30
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर निपाणीजवळ भरधाव एसटी बसच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून ऊसतोड मजूर महिला ठार झाली, तर दहाजण गंभीर जखमी झाले. चंद्रभागाबाई गंगाधर खाजेकर (वय ६०, रा. ढोपेसर, ता. बदनापूर, जि. जालना) असे मृत महिलेचे नाव आहे. शनिवारी सकाळी हा अपघात झाला.
कोल्हापूर : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर निपाणीजवळ भरधाव एसटी बसच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून ऊसतोड मजूर महिला ठार झाली, तर दहाजण गंभीर जखमी झाले. चंद्रभागाबाई गंगाधर खाजेकर (वय ६०, रा. ढोपेसर, ता. बदनापूर, जि. जालना) असे मृत महिलेचे नाव आहे. शनिवारी सकाळी हा अपघात झाला.
अधिक माहिती अशी, जालना येथील ऊसतोडणी मजुरांच्या १५ टोळ्या कर्नाटकातील एका कारखान्याकडे निघाल्या होत्या. मुकादम स्वत:च्या ट्रॅक्टर-ट्रॉलीतून १५ प्रमुख कामगार व त्यांचे कुटुंबीय असे २३ ते २५ जणांना घेऊन शुक्रवारी दुपारी जालन्यातून बाहेर पडला. शनिवारी सकाळी निपाणीपासून काही अंतरावर एमकेएस मोटर्सजवळ बायपास रोडने ते कर्नाटकात जात होते.
यावेळी ओव्हरटेक करीत पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या भरधाव एसटी बसने ट्रॅक्टरला एका बाजूने धक्का दिला. त्यामध्ये ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली. दोन्ही ट्रॉलीतील मजूर बाहेर रस्त्यावर फेकले गेले. मजुरांच्या डोक्याला, हाता-पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले.
जखमींना रुग्णवाहिकेतून कोल्हापूर, निपाणी व कागल येथील रुग्णालयांत पाठवले. चंद्रभागाबाई खाजेकर यांचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर बसचालक न थांबता बससह पळून गेला, तर ट्रॅक्टरचालकही पळून गेला. निपाणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
जखमींची नावे अशी :
लक्ष्मण सोलाजी मिसाळ (वय ६५), प्रवीण प्रशांत आर्सड (२२), भारतीबाई लक्ष्मण मिसाळ (५५), निशा भाऊसाहेब खाजेकर (८), शीतल भाऊसाहेब खाजेकर (२० रा. सर्व ढोपेसर, ता. बदनापूर, जि. जालना). लक्ष्मण मिसाळ याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.