कोल्हापूर : ‘बाबूजमाल’ची खाई फोडण्याचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 01:00 PM2018-09-20T13:00:40+5:302018-09-20T13:05:04+5:30
मोहरमच्या नवव्या दिवशी सायंकाळी शहरातील अनेक पीरपंजांनी सवाद्य मिरवणुकीने येऊन बाबूजमाल तालमीतील हजरतपीर नाल्या हैदर कलंदर या पीरपंजाच्या भेटी घेतल्या. यावेळी परिसरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दिवसभर भक्तांनी मलिद्याचा नैवेद्य दिला.
कोल्हापूर : मोहरमच्या नवव्या दिवशी सायंकाळी शहरातील अनेक पीरपंजांनी सवाद्य मिरवणुकीने येऊन बाबूजमाल तालमीतील हजरतपीर नाल्या हैदर कलंदर या पीरपंजाच्या भेटी घेतल्या. यावेळी परिसरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दिवसभर भक्तांनी मलिद्याचा नैवेद्य दिला.
खत्तल रात्रीनिमित्त रात्री बाबूजमाल दर्गासह काही ठिकाणी खाई फोडण्याच्या कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पार पडला. शहरातील शिवाजी रोडवरून विविध पीरपंजे घुडणपीर, बाबूजमाल, बाराईमामच्या भेटीला रात्री उशिरापर्यंत जात होते.
कोल्हापुरात बाबूजमाल दर्गा येथे खत्तलरात्रीनिमित्त खाई फोडण्याचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने करण्यात आला. (छाया : नसीर अत्तार)
मुस्लिम धर्मातील पवित्र मोहरमनिमित्त बुधवारी दिवसभर शिवाजी चौकातील घुडणपीर, बाराईमाम, बाबूजमाल तालीम येथील हजरतपीर नाल्या हैदर कलंदर या पीरपंजाला भक्तांनी वस्त्र चढवले. तसेच मलिदा, भाकरी, वडी, भाजी नैवेद्य दिला जात होता.
सायंकाळी शहरातील विविध पीरपंजे हालगीच्या ठेक्यात तसेच पारंपरिक वाद्यात हजरतपीर नाल्या हैदर कलंदर या पीरपंजाला भेटीला येत होते. त्यामुळे बाबूजमाल तालीम परिसरात भक्तांची अलोट गर्दी होती. हजरतपीर नाल्या हैदर कलंदरचे दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या; तर विद्युत रोषणाई व खेळण्यांनी परिसर फुलून गेला होता. यासाठी तालीम मंडळाचे कार्यकर्ते परिश्रम घेत होते.
शहरात बाबूजमाल दर्गासह मंगळवार पेठेतील अवचीतपीर तालीम, सणगर गल्ली-बोडके गल्ली तालीम, शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम, आदी ठिकाणी खत्तल रात्रीनिमित्त खाई फोडण्याचा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत पारंपरिक पद्धतीने पार पडला.
पीरपंजे, गणेश देखावे पहाण्यासाठी रस्ते फुल्ल
यंदाच्या वर्षी गणेशोत्सव आणि मोहरम हे हिंदू-मुस्लिम धर्मियांचे पवित्र सण एकाचवेळी आल्याने दोन्हीही समाजातील बांधव पीरपंजे व गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी बाहेर पडल्याने शिवाजी रोड, गुजरी, महाद्वार रोड परिसरात मोठी गर्दी दिसून येत होती.
दोन दिवस खत्तल रात्र व ताबूत विसर्जन
खत्तल रात्र आणि ताबूत विसर्जनबाबत अनेक मुस्लिम बांधवांमध्ये संभ्रमावस्था कायम राहिली. बुधवारी खत्तलरात्र मानून शहरातील काही दर्गामध्ये खाई फोडण्याचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पार पडला. त्यांचे आज, गुरुवारी सायंकाळी ताबूत विसर्जन होणार आहे. तर चंद्रदर्शनवरून काही ठिकाणी आज, गुरुवारी खत्तल रात्र मानून खाई फोडण्याचा कार्यक्रम होत आहे.
त्यामध्ये घुडणपीर दर्गा, बाराईमाम, दिलबहार तालीम, नंगीवली दर्गा, केसापूर गल्लीतील कागदी मश्जीद, लक्ष्मीपुरीतील गरीब शहा, शाहू मिल परिसरातील झिमझीम साहेब, शिवाजी विद्यापीठ परिसरातील महाबूत वाणी दर्गा यांचा समावेश आहे. त्यांचे ताबूत विसर्जन उद्या, शुक्रवारी होणार आहे.